अभय योजनेदरम्यान १९० मिळकती सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:52+5:302020-12-23T04:08:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेने सुरु केलेल्या अभय योजनेंतर्गत थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पालिकेने सुरु केलेल्या अभय योजनेंतर्गत थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून कर आकारणी व कर संकलन विभागाने आतापर्यंत १९० मिळकती सील केल्या आहेत. यातील ८१ जणांनी पैसे भरल्याने सील काढण्यात आले. थकबाकीमुळे आतापर्यंत १४ मिळकतींवर बोजा चढवण्यात आला आहे.
कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यातही कर संकलन विभागाने कोरोना काळात गेल्या आठ-नऊ महिन्यात केलेल्या प्रयत्नांमुळे पुणेकरांनी ऑनलाईन पद्धतीने तब्बल साडेबाराशे कोटींचा कर जमा केला.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अभय योजना आणण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत गेल्या दीड दोन महिन्यात साडेतीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. परंतु, अद्यापही अनेक मिळकतधारक कर भरत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पालिकेने अशा मिळकतधारकांना दणका द्यायला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात वानवडीमधील दोराबजी मॉल सील करण्यात आला आहे. तर, नुकतीच चंदननगर, खराडी, वडगाव शेरी येथील मिळकतीही सील करण्यात आल्या आहेत.
चौकट
“पालिकेने सुरु केलेल्या अभय योजनेचा हजारो पुणेकरांनी लाभ घेत साडेतीनशेपेक्षा अधिक मिळकत कर जमा केला आहे. परंतु, जे पालिकेच्या आवाहनाला तसेच नोटीसीला प्रतिसाद देत नाहीत अशांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत. आजवर १ लाख १७ हजार ११० पुणेकरांनी १ हजार २४७ कोटी १८ लाखांचा मिळकत कर जमा केला आहे.”
- विलास कानडे, प्रमुख, कर आकारणी व कर संकलन विभाग
चौकट
सील करुनही कर न भरल्यास लिलाव
मालमत्ता सील करुनही जर कर भरला जात नसेल तर अशांच्या मालमत्तांचा थेट लिलाव केला जाणार आहे.