ससून रुग्णालयात एका बेडवर २-३ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:33+5:302021-04-17T04:11:33+5:30
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सरकारी रुग्णालयात बेड्सचा मोठा तुटवडा जाणवत आहे. काही जणांना तर वेळेवर उपचार न ...
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सरकारी रुग्णालयात बेड्सचा मोठा तुटवडा जाणवत आहे. काही जणांना तर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. ससून रुग्णालयातील रुग्णांची बेड्सअभावी होणारी हेळसांड आणि भयावह वास्तव परिस्थिती दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यात ऑक्टोबरनंतर कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढतच चालली आहे. मार्च महिना तर सर्वाधिक घातक ठरला आहे. ससून रुग्णालयासह सध्या शहरातल्या जवळपास सर्व रूग्णालयांतील बेड भरले आहे. शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
त्यातच गरिबांसाठी वरदान असलेल्या ससून रुग्णालयाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एका बेडवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेताना दिसतात. जमिनीवर बसूनसुद्धा काहीजण उपचार घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणावरील ताण आणि भीषण परिस्थिती स्पष्ट होत आहे.