खेड तालुक्यात घरफोडी करणाऱ्या २ आरोपींना अटक; पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:45 PM2021-12-08T16:45:56+5:302021-12-08T16:46:03+5:30
घरातील कपाटातील ८२.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम दहा हजार असा एकुण दोन लाख,९३ हजार,४४० रुपयाचा माल चोरी करुन चोरून नेला होता
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील चांदुस येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना खेडपोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून सोन्याचे दागिने हस्तगत करून अटक केली आहे. महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय १९ ) रा सुलतानपुर, मंचर ता. आंबेगाव , चंद्रशेखर उर्फ राहुल शिवाजी राजगुरु (वय २४ ) रा. इंदीरानगर मंचर (ता. आंबेगाव ) अशी आरोपीची नांवे आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील महिन्यात १४ सप्टेंबर रोजी चांदुस येथे साधना अंकुश कारले ह्या राहत्या घराला कुलुप लावून माहेरी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्यांच्या दीराच्या घरचा पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आतील भिंतीवरुन कारले घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील ८२.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम दहा हजार असा एकुण दोन लाख,९३ हजार,४४० रुपयाचा माल चोरी करुन चोरून नेला होता. त्याबाबत कारले यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना तपास करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, चांदूस येथे संशयीतरित्या फिरत असताना दिसले होते. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने हे भांबोली (ता. खेड ) येथील ते राहत असलेले फ्लॅट मध्ये ठेवल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत.