पुणे जिल्ह्यातील ढोरे भांबुरवाडीत वीजवाहक तारांच्या स्पार्किंगमुळे २ एकरावरील ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 04:48 PM2018-02-09T16:48:54+5:302018-02-09T16:52:25+5:30
ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
दावडी : ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
भगवान कोंडिबा टाकळकर या शेतकऱ्याचा ढोरे भांबुरवाडी येथे दोन एकर क्षेत्रांत ऊस होता. ऊस तोडणीस तयार झाला होता. ऊसाची ८ दिवसांत तोडणी होणार होती. (दि. ८) रोजी दुपारी तीन वाजता वीज खांबावर वीज वाहक तारांचे स्पार्किंग होऊन ऊसाच्या शेतात जाळाच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे ऊसाने पेट घेतला. आग मोठी असल्याने उसाच्या शेतात पसरली वीस मिनिटात सर्व ऊस जळून गेला. रमेश ढोरे, अविनाश टाकळकर, रविराज राक्षे, संजय वाळुंज, काळू राम राक्षे, बबन राक्षे, शंकर वाळुंज यांनी प्रयत्न केले. मात्र आग मोठी व भडकल्यामुळे शेतकऱ्यांना आग विझविण्यास यश आले नाही. दोन एकर क्षेत्रामध्ये अंदाजे दीडशे टन ऊस निघाला असता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दीड लाखापर्यंत नुकसान झाले आहे.
कृषी सहायक, खेड तलाठी व वीज वितरण कंपनी अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दीड लाख रुपये नुकसान झाले असल्याचे शेतकरी टाकळकर यांनी सांगितले.