२ कोटींच्या बनावट, निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रिक वायर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:45+5:302021-02-10T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील पवन इलेक्ट्रिकल कंपनीच्या गोदामावर छापा घालून पोलिसांनी नामांकित पॉलीकॅब कंपनीच्या नावाने बनावट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेतील पवन इलेक्ट्रिकल कंपनीच्या गोदामावर छापा घालून पोलिसांनी नामांकित पॉलीकॅब कंपनीच्या नावाने बनावट वायरचा ४३ लाख रुपयांचा माल पकडल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने बुधवार पेठेतील भगवती इलेक्ट्रिक दुकान व त्यांच्या गोदामावर छापे घालून आज तब्बल २ कोटी विविध कंपन्यांच्या बनावट व निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रिक वायर व पॅकिंगचे साहित्य जप्त केले आहे.
शहरात अनेकवेळा शॉर्ट सर्किट होऊन इमारतींना आग लागणे, जीवित व मालमत्तेची हानी होण्याचे प्रकार घडत असतात. त्यात प्रामुख्याने बांधकामाच्या वेळी निकृष्ट व बनावट इलेक्ट्रीक वायर वापरल्याने हे प्रकार होत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या अपघातांना आळा बसावा, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बनावट वायर विक्री करणार्या इलेक्ट्रीक व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याची महत्वाकांक्षी मोहिमेला सुरुवात केली आहे.
पॉलीकॅब या कंपनीच्या बनावट वायरचा साठा पकडल्यानंतर पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांना मिळालेल्या माहितीवरुन बुधवार पेठेतील भगवती इलेक्ट्रिक्स दुकान व गोदामावर छापे टाकले. या कारवाईत सनफ्लेक्स केबल्स, गोल्ड लाईन एफ आर केबल्स, केसीपी केबल्स, हायफाय इन्सुलेटेड केबल्स, इडीसन केबल्स अशा वेगवेगळ्या ब्रँडचे नाव असलेले पॅकिंग तसेच सुटे वायर बंडल, पॅकिंगसाठी लागणारे रिकामे बॉक्स, इतर पॅकिंग साहत्या मिळून आले. पोलिसांनी भारतीय मानक ब्युरो यांच्या संकेतस्थळावर या ब्रँडचा आयएसआय परवानरूत्तचा शोध घेतला. त्यावेळी या ब्रँडचेचे आयएसआय परवाने रद्द किंवा कालबाह्य झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन ब्रँडची इलेक्ट्रीक वायर ही बनावट व निकृष्ट दर्जाची आहे याची पोलिसांना खात्री झाली. मार्केटयार्ड येथील भारतीय मानक ब्युरो यांच्याशी पत्रव्यवहार केला असता हे ब्रँड रद्द व कालबाह्य झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भगवती इलेक्ट्रीक दुकानाचे मालक रमेशकुमार आनंदलाल सुथार (वय ४३, रा. घोरपडी पेठ) याला अटक करण्यात आली. वेगवेगळ्या कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या वायर व साहित्य असा २ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बाेराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, सचिन ढवळे, प्रविण भालचिंम, रमेश राठोड, शितल शिंदे यांनी केली.
............
परराज्यात धागेदोरे, पथके रवाना
पुणे शहरातील १५ ते २० इलेक्ट्रीक दुकानदार बनावट व निकृष्ट दर्जाच्या वायर विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या बनावट वायर व्यवसायामध्ये अनेक धनाढ्य व्यावसायिक सामील असून त्यांचे धागेदोरे परराज्यात पसरलेले आहे. परराज्यात राहून बनावट व निकृष्ट दर्जाच्या वायर उत्पादन व विक्री करणार्या मोहक्यांना ताब्यात घेऊन तपास करण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या राज्यांमध्ये रवाना केली जाणार आहेत.
......
फोटो जेएम एडिटवर