खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाच्या बंगल्यांवर काढले २ कोटींचे कर्ज
By विवेक भुसे | Published: August 25, 2022 04:23 PM2022-08-25T16:23:33+5:302022-08-25T16:23:41+5:30
मालमत्तेवर नाव लावून केली फसवणूक
पुणे : घोरपडी येथील उच्चभ्रू परिसरातील दोन बंगले खरेदी करायचा बहाणा करुन त्याची कागदपत्रे घेऊन त्यांची परस्पर विक्री केली. तसेच त्यावर २ कोटी रुपयांचे कर्ज काढले. प्रॉपर्टीवर व वीज बिलावर नाव लावून व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी व्यावसायिक संजय मुरलीधर बजाज (वय ६२, रा़ उदयबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गजेंद्र भिकमचंद संचेती, गीतेश गजेंद्र संचेती, सुनिल भुजबळ, जितेंद्र रामनुज जस्वाल आणि त्रेजा रामचंद्र गिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते ४ मार्च २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे २ बंगले आहेत. हे बंगले खरेदी करण्याची संचेती व इतरांनी बतावणी करुन कर्ज प्रकरणाची चौकशी करायची आहे, असे सांगून त्यांच्याकडून मालमत्तेची कागदपत्रे घेतली. बनावट सह्या करुन तसेच त्यांच्या आधार कार्ड व पॅन कार्डमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे परस्पर बनावट दस्त तयार केले. फिर्यादी यांच्या ऐवजी तोतया व्यक्तीला उभे केले. त्यांची मालमत्ता परस्पर बेकायदेशीररित्या विक्री केली. त्यांच्या कागदपत्रांचा वापर करुन बनावट बँक खाते उघडून मुंबईतील पीएनबी हाऊसिंग फायनान्सकडून २ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. तसेच त्यांच्या मालमत्तेवर व वीज बिलावर स्वत:ची नावे लावून फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक माया गावडे तपास करीत आहेत.