टेम्पो-दुचाकी अपघातात २ ठार ; १ गंभीर जखमी
By admin | Published: November 20, 2015 02:44 AM2015-11-20T02:44:02+5:302015-11-20T02:44:02+5:30
राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील डिंगोरे (ता. जुन्नर) जवळील दत्तवाडीजवळ टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल चालक व त्याचा २ वर्षांचा
ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील डिंगोरे (ता. जुन्नर) जवळील दत्तवाडीजवळ टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल चालक व त्याचा २ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाले. तर, पत्नी गंभीर जखमी झाल्याने तिला पुणे येथे उपचारासाठी आळेफाटा येथून हलविण्यात आले आहे.
या अपघातात गोविंद उर्फ सुनील सदाशिव बोकड (वय ३०) व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अनिकेत गोविंद बोकड हे दोघे जागीच ठार झाले. तर, गोविंदची पत्नी योगिता ही गंभीर जखमी झाली असून, प्रथमत: तिला आळेफाटा येथील डॉ. सोनवणे येथे प्राथमिक उपचार करून पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. हे सर्व जण पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील आहेत.
ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे खबर मिळताच त्वरित घटनास्थळी दाखल झाले. रीतसर पंचनामा करून टेम्पो व टेम्पोचालक यांना ताब्यात घेतले आहे.
ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज ओतूरचा बाजार असल्यामुळे पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील गोविंद बोकड त्यांचा मुलगा व पत्नी हे बाजार करून त्यांच्या स्वत:च्या (एमएच १४ ह.ह. ७१०१) या क्रमांकाच्या मोटारसायकलवर पिंपळगाव जोगेकडे घरी परत जात होते. त्याच वेळी कल्याणकडून टेम्पो क्र. (एमएच ०४ डीडी ६३८२) हा भरधाव या मार्गाने ओतूरकडे येत होता. डिंगोरे जवळील दत्तवाडीपुढे मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने मोटारसायकल चालक व त्यांचा मुलगा जागीच ठार झाले व पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. आज सायंकाळी ६.१५ वाजता हा अपघात झाला. सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली के. एस. साबळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)