हडपसरला कालव्यात बुडून २ मुलींचा मृत्यू
By admin | Published: November 17, 2016 03:53 AM2016-11-17T03:53:22+5:302016-11-17T03:53:22+5:30
शाळेतून घरी परतत असताना छोट्या कालव्याच्या पाईपवरून जाताना तोल गेल्याने दोन शाळकरी मुली बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे.
हडपसर : शाळेतून घरी परतत असताना छोट्या कालव्याच्या पाईपवरून जाताना तोल गेल्याने दोन शाळकरी मुली बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या या दोन मुलींचे मृतदेह कालव्यातील घाण पाण्यात सापडले.
हडपसरच्या आठवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात काल दि. १५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. वैष्णवी संतोष बिराजदार व विद्या कुमार बद्रे (दोघीचे वय १३, रा. बिराजदार फाटा, मांजरी रोड , ता. हवेली) असे बेपत्ता झालेल्या दोन मुलींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही मुली साडेसतरानळी येथील ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आल्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास डबा आणण्याचे कारण सांगून त्या शाळेबाहेर पडल्या. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुली घरी परतल्याच नाही. पालकांनी परिसरात शोधा शोध केली. शाळेत, नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, शोध लागला नाही. त्यामुळे पालकांनी रात्री उशिरा दोन्ही मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी तक्रार दिली. वैष्णवीचे कुटुंब हे पूर्वी साडेसतरानळी येथे राहत होते. तर, विद्याचे कुटुंब दोन वर्षांपासून अन्सारी फाटा येथे राहत आहे. शाळेतून घरी जात असताना पाइपवरून जाताना या मुलींचा तोल गेला असावा, त्यामुळे त्या छोट्या कालव्याच्या घाण पाण्यात पडल्या व बुडाल्या. दि. १६ रोजी दुपारच्या सुमारास विद्याचा मृतदेह १५ नं जवळील कालव्यात सापडला, तर नंतर वैष्णवीचा मृतदेह अन्सारी फाटा येथे आढळला. दोघींचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे करीत आहेत. मुलींच्या घरी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.