अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, येरवड्यातील धक्कादायक घटना
By नम्रता फडणीस | Published: July 16, 2024 04:33 PM2024-07-16T16:33:03+5:302024-07-16T16:34:11+5:30
दोन मैत्रिणींनी मद्यपार्टी केली, त्यातील एका १६ वर्षीय मुलीची हि पार्टी अखेरची ठरली
पुणे : येरवडा भागातील दोन १६ वर्षीय मैत्रिणींनी घरी पार्टी केली. मात्र त्यातील एका मुलीची ही पार्टी अखेरची ठरली. तिने गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये तिच्यासमवेत पार्टी करणारी मैत्रीण अतिमद्यसेवनामुळे बेशुद्धावस्थेत सापडली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याने येरवडा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत तिची मैत्रीण अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला असलेली तनिषा ही महाविद्यालयात अकरावीत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी ( दि. )सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनीषाच्या घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तिच्या मैत्रिणीने दूरध्वनी करून रात्री आठच्या सुमारास बोलवून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले. तेव्हा तनिषाने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तिच्या मैत्रिणीला तेव्हा ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता तनिषा आणि मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. असून, पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्या होत्या. तनीषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.