ग्रामपंचायत कार्यालयासमोर २ तास ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:26+5:302021-04-07T04:12:26+5:30
येथील ग्रामपंचायतच्या तब्बल २९ कामगारांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नसताना अचानकपणे त्यांचे पगार कमी करण्यात आल्याने सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ...
येथील ग्रामपंचायतच्या तब्बल २९ कामगारांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नसताना अचानकपणे त्यांचे पगार कमी करण्यात आल्याने सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना ५ एप्रिल रोजी दिलेले असल्याने आज मंगळवार (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय समोरच ठिय्या मांडला. तर गटविकास अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सुमारे दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात काम सुरु केले आहे. ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी याबाबत माहीती दिल्यानंतर त्याचवेळी भ्रमणध्वनीवर गटविकास अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे काही वेळाने सर्व कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात काम सुरू केले आहे. मात्र अन्याय होत असल्यास सर्व कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम असल्याची भूमिका सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल दिल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत कडून होणाऱ्या अन्यायाबाबत आम्ही संप पुकारलेला आहे. आज आम्हाला गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने कोरून काळात गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी आम्ही काम सुरु केलेले आहे.पुढील दोन दिवसात आमच्या प्रश्नांबाबत निर्णय न झाल्यास पुढील दिशा ठरवली जाईल. -
कुमार ढमढेरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी फोनवर चर्चा करून काम सुरु करण्यास सांगितले आहे. तेथील ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीचा उत्पन्न अहवाल, कर्मचारी वेतन अहवाल तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आदी माहिती सादर करण्यास सांगितले आहे. सर्व माहितीची शहानिशा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
- विजयसिंह नलावडे, गटविकास अधिकारी, शिरूर
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यानंतर आज ग्रामपंचायत कार्यालय समोर मांडलेला ठिय्या.