पुणे विभागात २ लाख ३३ हजार नागरिक दुष्काळाने बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:55 PM2018-12-22T18:55:55+5:302018-12-22T18:58:43+5:30
पुणे विभागात कोल्हापूर वगळता सातारा, सांगली,सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे: दुष्काळाची तीव्रता वाढल्याने पुणे विभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या २ लाख ३३ हजार ८९१ वर गेली आहे.तर विभागातील १९ हजार ८०९ पशूधन दुष्काळाने प्रभावित झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे विभागातील १७ तालुक्यांमधील ८१२ वाड्या आणि ११६ गावांमध्ये १२० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.एकट्या माण तालुक्यातील बाधितांची संख्या ६८ हजारापेक्षा जास्त आहे.
पुणे विभागात कोल्हापूर वगळता सातारा, सांगली,सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २९५ वाड्या आणि ५० गावांमध्ये आणि पुणे जिल्ह्यात २८१ वाड्या आणि २४ गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे एकट्या सातारा जिल्ह्यात ४८ आणि पुणे जिल्ह्यात ४० टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.तर सांगली जिल्ह्यात २७ आणि सोलापूरमध्ये ५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात एकट्या माण तालुक्यात ६८ हजार ४९९ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून त्यांना ४० टँकर सुरू आहेत.तसेच खटाव,फलटण आणि कोरेगाव तालुक्यात उर्वरित एकूण १० टँकर सुरू आहेत.साता-यातील बाधित नागरिकांची संख्या ७८ हजार २५५ असून प्रभावित पशूधनाची संख्या १७ हजार ३६५ आहे.त्याचप्रमाणे सोलापूरात दुष्काळाने बाधित नागरिक १० हजार १९२ असून २ हजार २४४ पशूधन प्रभावित झाले असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------
पुणे जिल्ह्यातील दुष्काळाची तालुका निहाय आकडेवारी
तालुका बाधित नागरिक टँकर्सची संख्या
बारामती ३१,७१७ १६
दौंड १२,३८८ ७
पुरंदर २,४०९ २
शिरूर २१,४३४ ११
जुन्नर ४,१८० २
आंबेगाव १,२८१ २
--------------------------------.......
एकूण ७३,४०९ ४०