नारायणगाव येथे बंद घर फोडून २ लाख ३५ हजाराची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:31+5:302021-08-29T04:13:31+5:30
नारायणगाव : नारायणगाव येथील शेटेमळ्यात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील २ लाख किमतीचे ५ तोळे ...
नारायणगाव : नारायणगाव येथील शेटेमळ्यात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील २ लाख किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने व ३५ हजारांची रक्कम चोरून नेली. ही घटना दि. २६ ला सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
शैला चंद्रकांत शेटे (रा. शेटेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: शैला शेटे ह्या दि. २५ ला मुंबईला गेल्या होत्या. दि. २६ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास शेटे यांचा पुतण्या विघ्नेश राजू शेटे यांना बंद असलेल्या घराच्या दरवाजाची कडीकोयंडा, कुलूप तुटलेले दिसले. विघ्नेश शेटे याने घरात जाऊन पाहिले असता घरातील कपडे अस्ताव्यस्त करून कपाट ही उचकटलेले होते.
चोरीची माहिती मिळाल्यावर शैला शेटे ह्या तत्काळ मुंबई येथून नारायणगावला आल्या. त्यांनी कपाटात ठेवलेले एक सोन्याची दीड तोळे वजनाची चेन, एक सोन्याचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र व रोख ३५ हजार रुपये गेल्याचे निदर्शनास आले. नारायणगाव पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी किराणा दुकाने, मंगल कार्यालय, अंगणवाडी, वाहनचोऱ्या, घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी अज्ञात चोरट्यांचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ या संकल्पनेतून चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. हद्दीतील मुख्य गावांमध्ये दुचाकी पोलीस पथकाची गस्त सुरू आहे. नागरिकांनी जागृत व सतर्क राहावे. घराबाहेर, परगावी जाताना शेजारी राहणाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. आपण राहत असलेल्या परिसरात, शेजारी, आजूबाजूला अनोळखी, संशयित व्यक्ती आढळल्यास तत्काळ नारायणगाव पोलिसांना संपर्क करावे असे आवाहन केले आहे.