डेटिंग साईटवर रजिस्ट्रेशन करणाऱ्या मुलाला धमकावून २ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 08:24 PM2020-01-12T20:24:40+5:302020-01-12T20:26:45+5:30
१७ वर्षाचा मुलगा बारावीत शिकत आहे. त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. याबाबत त्याच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती़. नाव नोंदणी केल्यानंतर करिमा बिबी नावाच्या एका तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला.
पुणे : उच्चभ्रू कुटुंबातील एकुलत्या एक मुलाने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली. त्यानंतर त्याला धमकावत एका तरुणीने त्याच्याकडून तब्बल १ लाख ९४ हजार रुपये उकळले. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांच्या प्रयत्नामुळे बँकेने त्यातील १ लाख ५० हजार ३६६ रुपये गोठविले आहेत. हा प्रकार फेब्रुवारी ते ऑगस्ट २०१९ दरम्यान सुरु होता़.
या प्रकरणी एका ४३ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या माणिकबागेत रहात असून नोकरी करतात. त्यांचा १७ वर्षाचा मुलगा बारावीत शिकत आहे. त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. याबाबत त्याच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती़. नाव नोंदणी केल्यानंतर करिमा बिबी नावाच्या एका तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. तो लहान असल्याचे लक्षात आल्यावर त्याला भिती दाखविण्यास सुरुवात केली. तुझ्या घरी पोलीस येतील, तुला अटक करीत, असे सांगून त्यातून वाचायचे असेल तर बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्याने आईच्या नकळत तिच्या खात्यातून ऑनलाईन पैसे या तरुणीने सांगितलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु लागला. तो पैसे पाठविल्यावर बँकेतून येणारे मेसेज डिलिट करीत असल्याने आपल्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.
ऑगस्ट महिन्यात त्यांना बँकेतून आलेला मेसेज पाहण्यात आला. त्यांनी पतीला आपल्या खात्यातून पैसे काढले का अशी विचारणा केल्यावर त्यांनी नाही सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलाला विचारल्यावर तो रडायला लागला. त्याच्याकडे त्यांनी विचारपूस केल्यावर त्याने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी याची चौकशी केल्यावर संबंधित बँकेशी संपर्क साधून त्या बँक खात्यात १ लाख ५० हजार ३६६ रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले. सायबर पोलिसांच्या सुचनेनुसार बँकेने हे पैसे गोठविले आहे. सिंहगड रोड पोलिसांकडे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके अधिक तपास करीत आहेत.