२ लाखांसाठी विवाहितेचा खून, दंडाचे एक लाख आई-वडिलांना, पती आणि सासऱ्याला जन्मठेप
By नम्रता फडणीस | Published: October 11, 2023 02:46 PM2023-10-11T14:46:58+5:302023-10-11T14:47:38+5:30
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासूला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
पुणे : घर बांधण्यासाठी २ लाख रूपये माहेरून आणले नाहीत म्हणून विवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे डोके धडावेगळे करणा-या पती, सास-याला न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासूला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला आहे. दंडाच्या रक्कमेपैकी १ लाख रुपये मृत विवाहितेच्या आई, वडिलांना द्यावे, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.
पती कांताराम सत्यवान ढगे (वय २७), सासरे सत्यवान बबन ढगे (वय ५७) अशी जन्मठेप सुनावलेल्यांची नावे आहेत. तर, सासूला (वय ४०) सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. दीपाली कांताराम ढगे (वय २४) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दि. १० एप्रिल २०१३ रोजी ही घटना घडली.
घर बांधण्यासाठी २ लाख रूपये घेऊन ये. नाहीतर आई-वडिलांना घर बांधून द्यायला सांग, असा तगादा आरोपींनी सातत्याने दीपाली यांच्याकडे लावला. त्यांचा छळ करत मारहाण केली. पैसे आणि घर बांधून दिले नाही म्हणून आरोपींनी तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीचे डोके धडावेगळे करून अज्ञात स्थळी टाकून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी १५ साक्षीदार तपासले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. पाठक यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा न्यायालयात पैरवी अधिकारी पृथ्वीराज ताटे, सत्र न्यायालयात पैरवी अंमलदार सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचित, कोर्ट पैरवी हवालदार एस. बी. भागवत यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.