पंतप्रधानांनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रोचे २ मार्ग सुरु; जाणून घ्या तिकिटाचे दर अन् सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:41 PM2023-08-01T15:41:12+5:302023-08-01T15:41:35+5:30
२ ऑगस्टला सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दर १० मिनिटांनी या मार्गांवरून मेट्रो धावणार
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे मंगळवारी लोकार्पण होत आहे. ६ मार्च २०२२ ला त्यांनीच लोकार्पण केलेल्या वनाज ते रामवाडी या मार्गानंतर मागील वर्षभरात मेट्रो एक इंचही पुढे गेली नव्हती. आताही रुबी हॉल ते रामवाडी हा उन्नत मार्ग व स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा भुयारी मार्ग बंदच राहणार आहे.
वनाज ते रुबी हॉल व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन्ही मार्ग सिव्हिल कोर्ट स्थानकात एकत्र येतात. पिंपरी-चिंचवड पासून शिवाजीनगर पर्यंत उन्नत असलेला मार्ग शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत भुयारी आहे. यात पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केल्यानंतर लगेचच वनाज ते रुबी हॉल व पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट हे मार्ग मंगळवारपासूनच व्यावसायिक तत्त्वावर सुरू होणार असल्याचे महामेट्रोने कळवले आहे.
या दोन्ही मार्गांवरील तिकिटांमध्ये दर शनिवार, रविवार ३० टक्के सवलत दिली जाईल. पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज ३० टक्के सवलत आहे. वनाज ते रुबी हॉल तिकीट ३० रुपये असेल. पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट तिकीट ३० रुपये असणार आहे. वनाज ते पिंपरी-चिंचवड ३५ रुपये, रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड ३० रुपये, पिंपरी-चिंचवड ते पुणे स्टेशन ३० रुपये असे तिकीट दर असतील. येत्या काही दिवसात मेट्रो कार्ड वितरित करण्यात येणार आहे. त्यावरही १० टक्के सवलत असेल.
१ ऑगस्टला लोकार्पणानंतर लगेचच मेट्रो सुरू होईल. २ ऑगस्टला सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दर १० मिनिटांनी या मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. पिंपरी-चिंचवड ते पुणे या प्रवासाला २२ मिनिटे लागतील. महामेट्रोने या मार्गावर धावण्यासाठी ३ डब्यांच्या १८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडहून वनाजला जायचे असेल त्यांना सिव्हिल कोर्ट स्थानकात मेट्रो बदलावी लागेल. तोच प्रकार वनाजहून पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागेल.