२ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर, तरी बेड का मिळेना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:16+5:302021-05-11T04:10:16+5:30
नातेवाईकांची बेडसाठी धावपळ सुरूच : डॅशबोर्डवरील आकडेवारीत घोळ पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या ६७ टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण गृहविलगीकरणात असून, ...
नातेवाईकांची बेडसाठी धावपळ सुरूच : डॅशबोर्डवरील आकडेवारीत घोळ
पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या ६७ टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण गृहविलगीकरणात असून, २ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर, ३ टक्के रुग्ण व्हेंटिलेटररहित आयसीयू बेडवर, तर १४ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. जिल्ह्यात १४ टक्के रुग्ण ऑक्सिजनविरहित बेडवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कोरोना आढावा बैठकीत संबंधित आकडेवारी सादर करण्यात आली. २ टक्केच रुग्ण व्हेंटिलेटरवर असतील, तर नातेवाईकांना व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी धावपळ का करावी लागत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची अद्ययावत माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी डॅशबोर्डची व्यवस्था केली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी (१० मे) दुपारी ३ वाजता डॅशबोर्डवरील आकडेवारी तपासून पाहिली. त्यानुसार पुणे शहरातील एकाही रुग्णालयाच्या नावासमोर व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचे दाखवले होते. एकूण संख्या असलेल्या कॉलममध्ये मात्र ८०६ पैकी ५ व्हेंटिलेटर बेड शिल्लक असल्याची नोंद केली होती. रुग्णालयांच्या नावासमोरील तक्त्यात उपलब्ध व्हेंटिलेटररहित आयसीयू बेडची संख्या १४ दिसत होती. एकूणमध्ये मात्र ६२५ पैकी २४ बेड उपलब्ध असल्याचे दाखवण्यात आले होते. डॅशबोर्डवरील बेरीज आणि आकडेवारीतच इतकी तफावत असेल, तर रुग्णांनी कशाच्या आधारे बेड शोधायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयांमध्ये प्रत्यक्षात ४ व्हेंटिलेटर बेड शिल्लक असताना एकूण संख्या असलेल्या कॉलममध्ये ही संख्या ४७९ पैकी ११ बेड उपलब्ध असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात ६९ व्हेंटिलेटररहित आयसीयू बेड शिल्लक असताना ही संख्या ८९३ पैकी १२३ इतकी नोंदवली गेली होती. पुणे ग्रामीणमधील उपलब्ध १८८ पैकी १ व्हेंटिलेटर उपलब्ध आणि ३१७ व्हेंटिलेटररहित आयसीयू बेडपैकी ३५ बेड शिल्लक असल्याची रुग्णालयांच्या नावासमोरील आणि एकूण संख्येच्या कॉलममधील आकडेवारी जुळत असल्याचे निदर्शनास आले.
आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार: पुणे शहरात ७१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये ६६, तर पुणे ग्रामीणमध्ये ६२ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्याचप्रमाणे अनुक्रमे ८ टक्के, १३.८ टक्के आणि २१.५ टक्के रुग्ण ऑक्सिजन विरहित बेडवर आहेत. पुणे शहरात १६.५ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेड, १.५ टक्के आयसीयू बेड, तर २ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १४.३ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेड, ५.३ टक्के आयसीयू बेड, तर २.२ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे ग्रामीणमध्ये ११.३ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेड, ३.९ टक्के आयसीयू बेड, तर १.४ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
-----
पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत सादर रुग्णसंख्येची आकडेवारी :
सक्रिय रुग्ण
९६,५१६
गृहविलगीकरणातील रुग्ण
६४,४८३
(६७ %)
ऑक्सिजनविरहित बेडवरील रुग्ण
१३,९२५
(१४.४%)
ऑक्सिजन बेडवरील रुग्ण
१३,६६२
(१४.१ %)
व्हेंटिलेटररहित आयसीयू बेडवरील रुग्ण
३१६१
(३.२%)
व्हेंटिलेटरवरील रुग्ण
१७९२
(१.८%)