ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील २ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक
By नितीश गोवंडे | Published: November 17, 2023 05:58 PM2023-11-17T17:58:28+5:302023-11-17T17:59:02+5:30
कर्तव्यात हलगर्जीपणा अन् निष्काळजीपणा केल्याचा ठपका
पुणे: ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली दाखल झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणात पुणेपोलिस दलातील २ कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने शुक्रवारी अटक केली. ललित पाटील याने २ ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ या कैदी वॉर्डमधून पोलिसांचा पहारा असताना पलायन केले होते. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी लगेचच कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत २ महिला पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. पोलिस कर्मचारी नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या अटकेमुळे पुणे पोलिस दलात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
ललित पाटील याला डिसेंबर २०२० मध्ये चाकण पोलिसांनी २० कोटी रुपयांच्या मेफेड्रोन या अमली पदार्थ प्रकरणात अटक केली होती. यानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात तो बंदिस्त असताना, आजारपणाच्या नावाखाली ‘अर्थ’पूर्ण संबंधांनी तो ससून रुग्णालयात दाखल झाला होता. यादरम्यान ललितने पैशांच्या जोरावर त्याला पाहिजे त्या सुविधा मिळवल्याचे देखील समोर आले होते. यामध्ये कैदी वॉर्डच्या बंदोबस्तासाठी असलेले पोलिस अधिकारी-कर्मचारी देखील सहभागी होते.
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालय परिसरात सापळा रचून ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल आणि रौफ शेख या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल दोन कोटी १४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी ससून रुग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. त्यानंतर ललित अटक होण्याच्या भीतीने ससून रुग्णालयातून पसार झाला होता. यावेळी जाधव आणि काळे हे दोघेही ससून रुग्णालयात कैदी वॉर्डच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर हजर होते. नाथाराम काळे याने आरोपी हाताला हिसका देऊन पळून गेला असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज मध्ये ललित पाटील हा अगदी निवांत रस्त्याने पायी चालत जात असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे ललित पाटील पसार झाल्यानंतर ज्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेला होता त्याच हॉटेलमध्ये थोड्यावेळाने पोलिस कर्मचारीही दिसून आल्याने बंदोबस्तावरील पोलिस संशयाच्या भोवऱ्यात आले होते. दरम्यान, पोलिस तपासात काळे आणि जाधव यांनी कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ चे पथक करत आहे.