सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:03 AM2024-01-23T10:03:39+5:302024-01-23T10:04:03+5:30
बहिणींना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली अन् मृत्यू ओढावला
पुणे : पानशेत धरणातील सांडव्यावर थांबून सेल्फी काढताना दोन बहिणी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी भावाने पाण्यात उडी घेतली, मात्र तिघेही वाहून जाऊ लागले. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी मुलींना वाचवले. मात्र,यात भावाचा बुडून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदत केल्याने अनुसया बालाजी मनाळे आणि तिची बहीण मयूरी मनाळे या बचावल्या आहेत. ज्ञानेश्वर मनाळे हा त्याची बहीण अनुसया, मयूरी यांच्यासह मित्र-मैत्रिणींसोबत रविवारी पानशेत धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी तीनच्या सुमारास ज्ञानेश्वरसह मित्र-मैत्रिणी दुचाकीवरून घरी निघाले.
पानशेत धरणाच्या वीज निर्मिती केंद्राच्या परिसरातील पुलावरून ते निघाले होते. त्यावेळी धरणातील सांडव्यावर सर्वजण उतरले. पाण्यात उभे राहून अनुसया आणि मयूरी मोबाइलवर छायाचित्रे काढत होत्या. त्यावेळी अनुसयाचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पाण्याला वेग असल्याने ती वाहून जाऊ लागली़ तिला वाचविण्यासाठी मयूरी पाण्यात उतरली. पाण्याला वेग असल्याने मयूरी बुडाली. अनुसया आणि मयूरी यांना वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरही पाण्यात उतरला. पाण्याला वेग असल्याने ज्ञानेश्वर बुडाला. ज्ञानेश्वरबरोबर असलेल्या मित्रमैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. अनुसया आणि मयूरी यांना वाचविण्यात यश आले. मात्र, ज्ञानेश्वर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. नातेवाइकांच्या हवाली केला. वेल्हे पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.