पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:21 PM2023-05-23T15:21:55+5:302023-05-23T15:22:07+5:30
२ हजारच्या नोटा कोणीही जपून ठेवत नाही, परंतु ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांचीच नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी
पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यांनी लगेच बँकांमध्ये जाऊन पैसे बदलण्यासाठी विचारणा केली; पण बँकांना २३ मेपासून नोटा बदलून देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तूर्त ज्या नागरिकांकडे दोन हजारांच्या नोटा होत्या, ते त्यांच्या बँक खात्यात मात्र पैसे जमा करू शकत होते. त्यासाठी काही बँकांमध्ये बऱ्यापैकी नागरिक येऊन पैसे जमा करत असल्याचे दिसून आले.
दोन हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर त्या घराघरांतून लगेच बाहेर येऊ लागल्या आहेत. खरंतर चलनात या नोटा खूप प्रमाणात वापरल्या जात नव्हत्या. कारण एक तर नागरिक आता मोबाइलवर यूपीआयचा खूप वापर करत आहेत आणि दुसरे म्हणजे दोन हजारच्या नोटा कोणीही जपून ठेवत नाही. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, त्यांनीच आता पैसे बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली. परंतु, त्यांना बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, २३ मेपासून नोटा बदलण्यासाठी परवानगी दिली आहे. तोपर्यंत नागरिक आपल्या खात्यात २ हजारच्या नोटा जमा करू शकतात.
सध्या नागरिक मॉलमध्ये, पेट्रोल भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा देत असल्याचे दिसून आले. त्या नोटा सर्वत्र स्वीकारल्यादेखील जात आहेत. कारण या नोटा बदलून देण्यासाठी सप्टेंबर २०२३पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणून बरेच नागरिक बँकांमध्ये जाऊन नोटा बदलण्यापेक्षा खरेदी करताना त्या वापरत आहेत. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर २ हजारांच्या नोटा येत असल्याचे पंप कर्मचाऱ्यांनी सांगितले.
एक साधा अर्ज भरून द्यावा लागेल
आता बॅंकेत दोन हजारच्या नोटा घेऊन येणारे ग्राहक आहेत. परंतु, त्याबदल्यात पैसे हवे असतील, तर ते उद्या म्हणजे २३ मेपासून देण्यात येणार आहेत. आता दोन हजारच्या नोटा तुमच्या बॅंक खात्यात जमा करता येतात. ते करण्यासाठी ग्राहक येत आहेत. मंगळवारपासून दोन हजारांची नोट बदलून देण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी एक साधा अर्ज भरून द्यावा लागेल. ओळखपत्राची गरज लागणार नाही. पण ग्राहकांनी एखादे ओळखपत्र सोबत ठेवण्यास हरकत नाही. - दिलीप मांढरे, शाखा व्यवस्थापक, आयडीबीआय बॅंक, बाजीराव रस्ता
मुदतीनंतरही कायदेशीर वैधता अबाधित
ही केंद्राची नोटाबंदी नसून, रिझर्व्ह बँकेने त्यांच्या अधिकारात क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत घेतलेला निर्णय आहेे. नोटा बदली करण्याबाबतचा हा आदेश आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नोटा बदलून घेऊ शकता. या मुदतीनंतरही आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या २ हजारांच्या नोटांची कायदेशीर वैधता अबाधित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी केली आहे.
नोट नाकारल्यास देशद्रोहाचा गुन्हा : अनास्कर
२० सप्टेंबरपूर्वी अथवा ३० सप्टेंबर २०२३ नंतरही २ हजारांच्या नोटा कोणालाही नाकारता येणार नाहीत, जर कोणी २ हजारांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला, तर संबंधिताविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. २ हजारांच्या नोटा छपाई होताना त्याचे आयुर्मान ५ वर्षांचे निश्चित केले होते. याची छपाई रिझर्व्ह बँकेने २०१८ मध्येच बंद केली होती. त्यामुळे या निर्णयाचा जास्त परिणाम व्यापार क्षेत्रावर होणार नाही. ३० सप्टेंबर २०२३ नंतरही २ हजारांची नोट केवळ ‘कागज का तुकडा’ नाही तर कायदेशीर नोट समजली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन बँकांमध्ये रांगा लावू नयेत. या नोटांमुळे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, असे राज्य सहकारी बॅंकेचे संचालक आणि बॅंकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
अनेकांनी फोन करून माहिती घेतली
जंगली महाराज रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शनिवारी (दि. २०) ९ लाख २६ हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्या. त्यामध्ये सीआरएन मशिनमध्ये ३९० नोटा जमा झाल्या आणि बँकेतील काउंटरमध्ये ७३ नोटा ग्राहकांनी आणून दिल्या. अशा एकूण ४६३ नोटा शनिवारी बँकेत जमा झाल्या आहेत. तसेच अनेक ग्राहकांनी फोन करून काय करावे लागेल, नोटा कशा बदलू शकतो, याबाबत माहिती घेतली. - मिलिंद पुरोहित, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, जंगली महाराज रस्ता
काही पंपांवर नकार
शहरातील मध्यवर्ती भागातील पेट्रोल पंपांवर दोन हजारच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे दिसून आले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने अनेक पंपांवर विचारणा केली असता दोन हजार रुपयांची नोट घेतली जात नाही, असे सांगितले गेले. परंतु, पुणे-सोलापूर रस्त्यावरील काही पेट्रोल पंपांवर मात्र २ हजारच्या नोटा स्वीकारल्या जात होत्या.
कोणी स्वीकारत नसेल, तर आमच्याकडे तक्रार करावी
शहरातील सर्व पेट्रोल पंपचालकांनी २ हजारच्या नोटा ग्राहकांकडून स्वीकाराव्यात. त्या नोटांना नकार देऊ नये, असा आदेश मी सर्व पेट्रोल पंप चालकांना दिलेला आहे. त्यामुळे शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर २ हजारच्या नोटा स्वीकारल्या जातील. कोणी स्वीकारत नसेल, तर आमच्याकडे तक्रार करावी. - अली दारूवाला, प्रवक्ता, पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशन