पाणीकपातीमुळे २ टीएमसी बचत
By admin | Published: January 4, 2016 01:13 AM2016-01-04T01:13:50+5:302016-01-04T01:13:50+5:30
शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे.
पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यापासून पुणेकरांची सुटका होण्यास मदत होणार आहे.
यंदा सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. यापार्श्वभुमीवर पुणे शहराच्या पाण्यात ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपलब्ध असलेले पाणी शहराला जुलै २०१६ अखेर पर्यंत पुरविण्याबरोबरच इतर दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे. यापार्श्वभुमीवर गेल्या ४ महिन्यात वाचलेले २ टिएमसी पाणी उन्हाळयात खूप उपयोगी पडणार आहे. पाणीकपात लागू करण्यापूर्वी शहराला दररोज १२५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यामध्ये कपात करण्यात आल्यापासून दररोज ८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात
८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यानुसार ४ महिन्यात २ टिएमसी पाणी वाचविण्यात यश आले आहे. पाणी कपातीबरोबरच जलवाहिन्यांमधील पाणी गळती रोखणे, त्याचा अपव्यय टाळणे. बांधकाम, जलतरण तलाव आणि अन्य व्यवासयिक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी आदी उपाययोजना महापालिकेकडून राबविण्यात आल्या. त्यामुळेही पाणी बचत होण्यास मदत झाली आहे. ही बचत अशीच सुरू राहिल्या जुलै २०१६ अखेर पर्यंत अजून ४ टिएमसी पाण्याची बचत होऊ शकणार आहे.
पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी एक हेल्पलाइन महापालिकेत सुरू करण्यात आली आहे. पाणी गळती होत असल्याचा फोन या हेल्पलाइनवर आल्यास लगेच त्याची दुरूस्ती केली जात आहे.