Pune: बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या २ महिला गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:25 PM2024-06-21T12:25:17+5:302024-06-21T12:25:52+5:30
चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, साडेतीन लाखांचे ५० ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्वारगेट एसटी स्थानकामध्ये करण्यात आली.
पुणे :स्वारगेट एसटी स्थानक व पीएमपी बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांकडील दागिने लांबवणाऱ्या दोन महिला चोरट्यांना स्वारगेटपोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, साडेतीन लाखांचे ५० ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्वारगेट एसटी स्थानकामध्ये करण्यात आली.
स्वारगेट एसटी स्थानकासह पीएमपी बस स्थानक व बस प्रवासादरम्यान प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्या अनुषंगाने तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार व संदीप घुले यांनी स्वारगेट एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटी स्थानक परिसरात सातत्याने पेट्रोलिंग केले.
दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की, दोन संशयित महिला एसटी स्थानकामध्ये फिरत आहेत. त्यानुसार तपास पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत स्वारगेट पोलिस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून ५० ग्रॅम वजनाचे साडे तीन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.
ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार, हर्षल शिंदे, रमेश चव्हाण, प्रवीण गोडसे, अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, दीपक खेंदाड, महिला पोलिस अंमलदार स्मिता सिताप आणि सुनीता घामगळ यांच्या पथकाने केली.
घरफोडी व मोबाइल चोराला पकडले
स्वारगेट पोलिसांनी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने एका घरफोडी व मोबाइल चोराला पकडले. शाहरुख सल्लाउद्दीन खतीब (२२, भाग्योदयनगर, गल्ली नं. १२, कोंढवा) असे या चोराचे नाव असून, त्याच्या ताब्यातून २ गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एका मोबाइलसह सोन्याचे दागिने असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.