वाळूमाफियांना भिगवण पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:39 PM2021-03-13T16:39:38+5:302021-03-13T17:07:29+5:30
२० जणांवर गुन्हा, १७ जणांना केली अटक
उजनी धरणातून वाळु उपसा करणाऱ्या वाळु तस्करांना महसुलच्या पथकाने तसेच भीगवण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी खानवटे आणि डिकसळ परिसरात वाळू उपसा करणाऱ्या बोटी तर चार सक्शन बोटी अशा एक कोटींच्या बोटी जिलेटीनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १७ जणांना अटक करण्यात आली आहे.
सिपू नुरुलहक्क शेख (वय ३०), मोहम्मद नाईम जलालुद्दीन अख्तर (वय २३), जहीर शहाजहान शेख (वय ३०), साहिब पेशकर शेख (वय ३२), मोहम्मद अहमद हुसेन शेख (वय ३०), मुश्राफ कादर शेख (वय २९), इस्माईल इनसाराली शेख (वय ३६), अनसुर इनामुल शेख (वय २८) तसेच त्यांचे इतर १० साथीदार आणि ३ बोटी मालक वाळू माफिया यांच्या विरोधात गुन्ह्या दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. फरार तीन आरोपींचा शोध सुरु आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकातील पोलीस हवालदार दतात्रय खुटाळे, इंन्क्लाब पठान, समीर करे, दतात्रय जाधव यांच्या पथकाने केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू माफियांवर भिगवणपोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत १ कोटी रुपयाची चोरी करण्यास आवश्यक असणारी यंत्रणा नष्ट करण्यात आली. उजनी धरणातील वाळू तस्करांवर अनेक वेळा कारवाई करूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. येथील वाळू उपस्याबाबत अनेककांनी तक्रारी केल्या होत्या. खानवटे आणि डिकसळ परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत चार बोटी आणि चार सक्शन बोटींनी वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जीवन माने यांनी पोलीस पथकासह उजनी धरणातील वाळू चोरी करणाऱ्या फायबर आणि सेक्शन यांच्यावर कारवाई केली. डीकसळ येथील पुलावर रात्री अडीच वाजता पोलीस गेले. या ठिकाणी त्यांना वरील चार बोटी वाळू उपसा करतांना दिसल्या. पोलिसांनी बोटीच्या साह्याने धरणात जात या वाळु उपसा करणाऱ्या बोटी ताब्यात घेत १७ जणांना अटक केली. या वेळी तीन बोट मालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. खानवटे येथेही कारवाई करत तेथील बोटी डिकसळ येथे आणल्या. यानंतर सकाळी याची माहिती महसुल विभागाला देण्यात आले. सकाळी महसुल विभागाचे पथक डिकसळ येथे आले. यावेळी त्यांनी बोटींची पाहणी केली. जिलेटीनच्या साहाय्याने पोलिसांच्या उपस्थितीत या सर्व बोटी नष्ट करण्यात आल्या.
वाळू तस्करांविरोधात कारावाईत सातत्य राखुन कठोर कारवाई केली जाणार आहे. काल केलेल्या कारवाईत १ कोटींच्या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत.
जीवन माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे
चौकट
आतापर्यत वाळू माफियावर केलेल्या कारवाईत तस्करांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. असे असले तरी वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण अल्प होते. बोटी नष्ट केल्या तरी झालेल्या नुकसानीचे दोन दिवसात पुन्हा दुरूस्ती करत वाळू माफिया पुन्हा सक्रीय होत आहे. मात्र, आता गुन्हे दाखल होत असल्याने खऱ्या अर्थाने वाळू माफियांचे कंबरडे मोडणार आहे.