विद्यापीठाला रुसाकडून २० कोटी
By Admin | Published: October 5, 2015 02:01 AM2015-10-05T02:01:33+5:302015-10-05T02:01:33+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) योजनेंतर्गत विद्यापीठामध्ये पायाभूत सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) योजनेंतर्गत विद्यापीठामध्ये पायाभूत सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठात सोलर एनर्जी प्रकल्प, मुलांसाठी नवीन वसतिगृह, कॉम्प्युटर लॅब, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आदी सुविधा जलद गतीने निर्माण करणे शक्य झाले आहे.
केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या रुसा योजनेंतर्गत राज्यातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वाटप केले जाते. परंतु, शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र रुसाच्या माध्यमातून निधी मिळविण्यात मागे आहे. परंतु, उशिरा का होईना राज्यातील विविध विद्यापीठांना रुसाच्या योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त होऊ लागला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २० कोटी रुपये निधी मिळाला आहे.
विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी. गायकवाड म्हणाले, विद्यापीठाने रुसातील १८ घटकांमधील ७ घटकांवर प्रस्ताव सादर केले होते. त्यात फॅकल्टी
डेव्हलपमेंट, क्लस्टर कॉलेजसाठी स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा, यूजीसीकडून कॉलेज व्हिथ पोटेंन्शियल फॉर एक्सलन्सचा (सीपीई) दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, इक्विपमेंट फॉसिलिटी डेव्हप्लेमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या घटकांचा समावेश होता.
विद्यापीठाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी २० कोटींचा
निधी मिळाल्याचे पत्र नुकतेच
प्राप्त झाले आहे. या निधीतून सोलर एनर्जी प्रोजेक्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॉम्प्युटर सेंटर, मुलांचे नवीन वसतिगृह आणि विद्यापीठ आवारातील खेळाच्या मैदानावर ४०० मीटर रनिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.
हायर एज्युकेशन फॉर स्टेट कौन्सिलच्या माध्यमातून राज्याच्या उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे काम केले जाते. मात्र, स्टेट कौन्सिलची एकही बैठक अद्याप घेतली गेलेली नाही. रुसाचे प्रस्तावही याच कौन्सिलमध्ये मंजूर करून शासनाकडे सादर केले जातात.