२० खिसेकापूंना जेजुरीत अटक
By admin | Published: March 29, 2017 02:45 AM2017-03-29T02:45:21+5:302017-03-29T02:45:21+5:30
कालच्या सोमवती यात्रेत गर्दीचा फायदा उठवून अनेकांचे खिसे साफ करणाऱ्या २० खिसेकापूंना स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे शाखेच्या
जेजुरी : कालच्या सोमवती यात्रेत गर्दीचा फायदा उठवून अनेकांचे खिसे साफ करणाऱ्या २० खिसेकापूंना स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अटक करून जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कालची सोमवती यात्रा आणि आज गुढीपाडव्याचा नववर्षाचा सण असल्याने काल जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी होती.
या गर्दीचा फायदा उठवून खिसेकापू करणाऱ्या टोळ्या यात्रेत सक्रिय होतील, हा अंदाज बांधून गुन्हे अन्वेषणचे एक पथकच आले होते. यात जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि पुणे गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सी. दी. झेंडे, पोलीस हवालदार जगदाळे, पोलीस शिपाई श्री. मोरे, श्री. शिरसाट, श्री. काळे आदींचा समावेश होता.
या पथकाकडून जेजुरीतील खंडोबागड, शहरातील मुख्य चौक, नंदी चौक, जेजुरी बसस्थानक या ठिकाणाहून २५ ते ६५ वर्षे वयोगटातील खिसे कापणारे व संशयित महिला व पुरुष एकूण २० जणांना ताब्यात घेतले.