गॅस संपल्याने दाहिनीत २० तास मृतदेह; नाईलाजास्तव लाकडावर दहन, कॅंटोन्मेंटमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:38 PM2023-06-30T13:38:47+5:302023-06-30T13:39:19+5:30
कॅंटोन्मेंटमध्ये आठवडयापूर्वीच एक कोटी खर्च करून ही नवीन गॅस दाहिनी बसवण्यात आली होती
लष्कर : गॅस दाहिनीमध्ये मृतदेह दहन करण्यासाठी गेल्यानंतर मध्येच गॅस संपला. त्यामुळे मृतहेदाचे अर्धवट दहन झाले. दुसऱ्या दिवशी नातेवाईक सावडण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघड झाली. त्यानंतर आलेल्या मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी दाहिनीत घेण्यात आले नाही. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना लाकडांवर दहन करावे लागले. ही घटना आज (गुरुवारी) कॅन्टोन्मेंट हद्दीतील स्मशानभूमीत उघडकीस आली. विशेष म्हणजे या गॅस दाहिनीचे उद्घाटन सात दिवसांपूर्वीच (२३ जुलै) झाले होते.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी सकाळी कॅन्टोन्मेंटच्या सीमेवरील नाना पेठेतील मंजुळाबाई चाळ येथील एकाचा मृत्यू झाला. त्यांना मृतदेहावर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करायचे होते; परंतु गॅस दाहिनीच बंद असल्याचे त्यांना कळविण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी मनसे कार्यकर्ते अतिश कुऱ्हाडे यांना ही बातमी सांगितली. कुऱ्हाडे यांनी स्मशानात जाऊन खात्री केली तेव्हा दाहिनीत २० तासांपूर्वीचे मृतदेह, तसेच असल्याचे उघड झाले. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या वार्ताहराला स्मशानात बोलावून घेतले. तेव्हा नाव न सांगण्याच्या अटीवर तेथील कामगारांनी सांगितले की, काल सायंकाळी ४ वाजेदरम्यान दोन मृतदेह दाहिनीत ठेवण्यात आले; परंतु गॅस संपल्यामुळे मृतदेह पूर्ण जळाला नाही. अखेर दुपारी ११.३० वाजता गॅसची चार सिलिंडर आली आणि त्यानंतर त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून पूर्वीची विद्युत दाहिनी पावसामुळे विद्युत दाहिनीची भालीमोठी चिमणी कोसळल्याने ती गुरुवारपर्यंत बंद होती. जुनी विद्युत दाहिनी २० वर्षांहूनही जुनी असल्याने तिच्यात अनेक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती सतत बंद पडायची आणि २४ तास ती चालू ठेवावी लागल्याने तिचे विद्युत बिलही महिन्याला लाखाच्या वर यायचे. त्यात बोर्डाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने ती दुरुस्त करणे किंवा नवीन बांधणे शक्य नव्हते. त्यामुळे या सर्वांवर उपाय म्हणून बोर्डाने लायन्स क्लब, बिबवेवाडी यांच्या सहकार्याने सीएसआर निधीतून दोन अत्याधुनिक, प्रदूषणविरहित १ कोटी २५ लाख रुपये किमतीच्या गॅस दाहिन्या बांधून घेत त्या स्मशानभूमीचे सुशोभीकरणदेखील केले होते. याला जवळपास दीड वर्षाचा कालावधी लागला होता. त्यादरम्यान अनेक गोरगरीब नागरिकांचे हालही झाले होते. शेवटी दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गेल्या शुक्रवारी, २३ जून रोजी के.जे.एस. चौहान (प्रबंधक रक्षा संपदा, सदर्न कमांड) यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटन होऊन केवळ सात दिवसांच्या आतच गॅसअभावी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळपास २० तास मृतदेह गॅस दाहिनीत असल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे.
मृतदेह घेऊन येऊ नका
आज सकाळी ९ वाजता आम्ही स्मशानभूमीत फोन केला असता गॅस संपला, या कारणाने तुमचा मृतदेह घेऊन येऊ नका, असा संदेश आम्हाला मिळाला. त्यामुळे आम्ही मृतदेहावर लाकडावर अंत्यसंस्कार केला. -आशिष कांबळे, मृताचे नातेवाईक