Pune News: कात्रज-कोंढवा रस्त्यावर टेम्पो उलटून २० वारकरी जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: July 1, 2024 12:20 PM2024-07-01T12:20:15+5:302024-07-01T12:20:25+5:30
याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.....
पुणे : वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी (दि. ३०) रात्री घडली. या अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत प्रयागबाई नारायण बोखारे (७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो रविवारी रात्री मुक्कामी निघाला होता. कात्रज - कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक १ येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली.
तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली, तसेच त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.