राज्यात २० लाख मतदार पत्त्याविना; ११ लाख मृत
By नितीन चौधरी | Published: September 29, 2023 07:05 AM2023-09-29T07:05:04+5:302023-09-29T07:05:54+5:30
मतदार पडताळणीत पुणे जिल्हा तळात; वाशीम, गडचिरोलीत शंभर टक्के
नितीन चौधरी
पुणे : मतदारांनी दिलेला पत्ता योग्य आहे का, ते त्याच पत्त्यावर राहत आहेत का, त्या पत्त्यावरील मृत मतदारांची नावे कायम आहेत का, तसेच नवमतदारांचा समावेश करायचा आहे का, या कारणांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑगस्टपासून मतदार पडताळणी मोहीम देशभर सुरू केली आहे. राज्यातही ही मोहीम सुरू असून वाशिम, गडचिरोली आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये १०० टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेत पुण्याचा क्रमांक तळात लागला असून जिल्ह्यात सर्वांत कमी अर्थात ८२ टक्के मतदारांची पडताळणी झाली आहे. या पडताळणीत ११ लाख १० हजारांहून मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
ही पडताळणी करत असताना राज्यात १९ लाख ८८ हजार ३६० मतदार त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. तर ११ लाख १० हजार ८८१ मृत मतदार आढळले आहेत. तर ७ लाख ४० हजार १ मतदार संबंधित विधानसभा मतदारसंघातून अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे सुमारे १८ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याच मोहिमेत ४ लाख २८ हजार ९६० मतदारांची छायाचित्रे बदलण्यात आली आहेत. राज्यात ६२ हजार ७६५ मतदार हे एकापेक्षा अनेक मतदारसंघांमध्ये असल्याचे आढळून आले आहेत.
पावणेनऊ कोटी मतदारांची पडताळणी पूर्ण
मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात ९ कोटी ८ लाख ३२ हजार ११५ मतदार असून आतापर्यंत ८ कोटी ६४ लाख ३४ हजार ७०५ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी ९५.१६ इतकी आहे. वाशिम, गडचिरोली व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सर्व मतदारांची अर्थात शंभर टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी पडताळणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ८० लाख ७३ हजार ११३ मतदारांपैकी ६६ लाख ५७ हजार ४३४ मतदारांची पडताळणी होऊ शकली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी ८२.५० इतकी आहे.
पुढील दहा दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रारूप मतदार यादी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ती २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत नवमतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे.
- श्रीकांत देशपांडे,
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र