Pune Crime: ड्रग्ज पार्सलची भीती घालून गंडवले २० लाखांना; सॉफ्टवेअर इंजिनिअरचीच फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: February 2, 2024 06:43 PM2024-02-02T18:43:19+5:302024-02-02T18:43:52+5:30
याप्रकरणी कुमठेकर रस्ता येथे राहणाऱ्या अमेय प्रकाश बर्वे (३९) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
पुणे : कुरिअर कंपनीतून बोलत असून तुमच्या आधार कार्डचा नंबर वापरून मुंबई ते तैवान असे पार्सल जात आहे. पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी नार्कोटिक्स सेल मुंबई येथे तुमचे पार्सल अडकले असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेत सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल २० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कुमठेकर रस्ता येथे राहणाऱ्या अमेय प्रकाश बर्वे (३९) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाइलवर फोन करून फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार नंबर वापरून मुंबई येथून एक पार्सल तैवानला पाठवले असून, त्यामध्ये ५ मुदतबाह्य पासपोर्ट, ५ डेबिट कार्ड, ७५० ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज अशा गोष्टी पाठविण्यात येत आहेत. यासाठी तुम्हाला पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावे लागेल, यासाठी तुमचा फोन अंधेरी येथील नार्कोटिक्स सेलला ट्रान्स्फर करत आहे, असे सांगितले. तसेच, समोरील व्यक्तीने फिर्यादींना उद्देशून ‘तुम्हाला ३ ते ७ वर्षे शिक्षा होऊ शकते’ असे सांगून भीती दाखवली. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.
अशी झाली फसवणूक :
सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना स्काइपवर व्हिडीओ कॉल करायला सांगितला. त्यानंतर मुंबई नार्कोटिक्सला जोडायला सांगून आधार कार्ड स्क्रीनवर ठेवून बोलण्यास सांगितले. तसेच तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरण्यात येत असून, आम्हाला ट्रान्झॅक्शन करून बघायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर अकाउंटमधील सर्व रक्कम पत्नीच्या खात्यावर पाठवण्यास सांगितले. लिंकद्वारे फिर्यादींच्या मोबाइलचा संपूर्ण ॲक्सेस मिळाल्याने रक्कम ट्रान्स्फर करताना खासगी माहिती सायबर चोरांनी मिळवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या कागदपत्रांच्या आधारे प्री अप्रूव्हड लोनमधून २० लाखांचे परस्पर कर्ज घेतले. कर्ज आपल्या बँक खात्यावर वळवून सायबर चोरट्यांनी २० लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अशी घ्या काळजी
- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.
- असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.
- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नका.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.