Pune Crime: २० लाखांचे ५ कोटी करुन देण्याच्या नावाखाली गंडा; नारायण पेठेतील घटना
By विवेक भुसे | Published: September 28, 2023 02:37 PM2023-09-28T14:37:31+5:302023-09-28T14:38:20+5:30
हा प्रकार नारायण पेठेतील पटवर्धन गड अपार्टमेंटमध्ये ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला...
पुणे : पाण्याच्या टाकीत टाकलेल्या पैशांचे पूजा केल्याने १० -२० पट पैसे होतात, यावर अजून ही लोक विश्वास ठेवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी चौघा जणांनी एका महिलेला २० लाख रुपयांना चुना लावला आहे.
याबाबत नारायण पेठेत राहणार्या एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड आणि आनंदस्वामी अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नारायण पेठेतील पटवर्धन गड अपार्टमेंटमध्ये ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटच्या व्यवहाराने दोन महिन्यांपूर्वी तन्वीर पाटील याच्यासोबत ओळख झाली होती. पाटील याने इतरांशी संगनमत करुन तिघांना २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देतो, अशी बतावणी केली. त्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी २० लाख रुपये जमवले.
पैसे बॅरलमध्ये टाकून केला धूर-
१३ सप्टेंबर रोजी आरोपींनी एका २०० लिटरच्या बॅरलमध्ये २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर रुमची लाईट बंद करुन रुममध्ये धुर केला. त्यांना रुमचे बाहेर काढले. त्यानंतर १० मिनिटांनी ते रुमच्या बाहेर आले. रुमला लॉक करुन फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करुन आल्यानंतर २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी रुपये होतील, असे सांगून ते २० लाख रुपये घेऊन निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे.