मीनथडी यात्रेत २० लाखांची उलाढाल

By admin | Published: April 25, 2016 02:19 AM2016-04-25T02:19:40+5:302016-04-25T02:19:40+5:30

महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना व्यवसायाची गोडी लागावी, या हेतूने नारायणगाव येथील इंद्रधनू ग्रुपच्या वतीने आयोजित केली

20 lakhs turnover in the Meenathadi yatra | मीनथडी यात्रेत २० लाखांची उलाढाल

मीनथडी यात्रेत २० लाखांची उलाढाल

Next

नारायणगाव : महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना व्यवसायाची गोडी लागावी, या हेतूने नारायणगाव येथील इंद्रधनू ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मीनथडी यात्रेत महिलांनी स्वत: बनविलेले खाद्यपदार्थ, विविध कलात्मक वस्तू, कपडे आदी वस्तूंची विक्री करून सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल केली, अशी माहिती इंद्रधनू ग्रुपच्या संस्थापिका राजश्री बोरकर यांनी दिली.
या मीनथडी यात्रेचे ६ वे वर्ष आहे. त्याचे उद्घाटन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नारायणगावच्या सरपंच जयश्री मेहेत्रे, उपसरपंच संतोष पाटे, संतोष वाजगे, रामदास अभंग, रमेश पांचाळ, आशिष माळवदकर, रोहिदास केदारी, वन अधिकारी मनीषा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मीनथडी यात्रेत ७० स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये मासवडी, शेंगोळ्या, पाणीपुरी, थालपीठ असे स्वत: बनविलेले स्वादिष्ट खाद्यपदार्थ, हाताने बनविलेल्या विविध लोकरीच्या वस्तू, विविध कलात्मक वस्तू, कपडे, कलाकुसर असलेल्या साड्या, आयुर्वेदिक औषधे, लहान मुलांसाठी विविध गेम्स, असे विविध प्रकारचे खास महिलांनी तयार केलेल्या वस्तूचे स्टॉल या यात्रेत लावण्यात आले होते. या यात्रेत कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. लहान मुलांना या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले होते. दर वर्षी या यात्रेचे स्वरूप वाढत चालले असल्याने आर्थिक उलाढालही वाढली आहे. यामुळे महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळून आर्थिक प्रगतीही होऊन विक्रीला बाजारपेठ मिळत असल्याचे महिलांनी सांगितले.
या यात्रेचे नियोजन इंद्रधनू ग्रुपच्या अध्यक्षा शीतल ठुसे, उपाध्यक्षा भारती खिवंसरा, जुई बनकर, अंजली खैरे, सुरेखा वाजगे, प्रांजल भुतडा, सुनीता बोरा, नंदा मुथ्था, ज्योती गांधी, सुलभा जठार, निर्मला गायकवाड, कल्पना भामरे, वर्षा कुऱ्हाडे, अरुंधती हाडवळे यांनी केले होते. (वार्ताहर)
या यात्रेमुळे महिलांना स्वयंरोजगाराचे माध्यम मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काही महिलांनी स्वत:चे दुकान, मेस सुरू करून आर्थिक उत्पन्नाचे साधन सुरू करून संसाराला आर्थिक हातभार लावत आहे. ही यात्रा किमान तीन दिवस सुरू राहावी, अशी मागणी महिलांनी व ग्राहकांनी केली आहे. या यात्रेला पंचायत समिती सभापती संगीता वाघ, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे आदींनी भेट दिली.

Web Title: 20 lakhs turnover in the Meenathadi yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.