पुणे महानगरपालिकेकडून २० चौकांची पुनर्रचना हाेणार अन् वाहतूक कोंडी फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:14 AM2023-10-30T11:14:49+5:302023-10-30T11:15:11+5:30
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून १५ रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करण्यात येणार
पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून १५ रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यांवरील सुमारे २० चौकांची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यात चौकांतील वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांना डाव्या बाजूला, सरळ जाण्यासाठी फ्री-वे उपलब्ध करून देणे, अनावश्यक पदपथ, वाहतूक बेटे काढणे, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा, चौकात अडथळा असलेले सिग्नल रस्त्याच्या बाजूला घेणे, चौकातील अनधिकृत बांधकामे काढणे, अनधिकृत पार्किंग बंद करणे या उपाय योजनांचा समावेश आहे.
महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मुख्य चौकात गेल्या काही वर्षांत पदपथ, वाहतूक बेटे, आवश्यकतेनुसार, वेगवेगळे दुभाजक अशा प्रकारे सातत्याने बदल केलेले आहेत. मात्र, शहरातील वाढत्या खासगी वाहनांची संख्या, चौकांमध्ये झालेले अतिक्रमण, तसेच चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांमुळे चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चौकात मोठ्या प्रमाणात रुंदीकरणाची जागा ताब्यात असल्याने त्यावर पार्किंग, तसेच इतर कारणामुळे वाहने थांबत असल्याने मोठे रस्ते ओलांडताना नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन चौकांची फेरचना केली जाणार आहे.
जी २० अंतर्गत या रस्त्यांची महापालिका दुरुस्ती करून त्यासाठी यापूर्वीच निविदा काढल्या आहेत. त्यामधून हे काम केले जाणार आहे, तर यासाठीचा निधीही महापालिकेस आधीच प्राप्त झाला आहे. त्यामुळे, महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने हे चौक दुरुस्त केले जाणार आहेत.
महापालिकेकडून १५ रस्ते आदर्श रस्ते तयार करण्यात येत आहे. या रस्त्यांवरील सुमारे २० चौकांची वाहतूक नियोजनकारांकडून पुनर्रचना केली जाणार आहे. नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौक, तसेच वारजे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका