अल्पवयीन चोरट्यांकडून चोरीच्या वीस दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:04 PM2018-04-21T13:04:46+5:302018-04-21T13:04:46+5:30
पोलिसांना या मुलांनी आणखी २० दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानंतर शहराच्या विविध भागातून सर्व दुचाकी जप्त केल्या.
पिंपरी : दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या विविध कंपन्यांच्या २० दुचाकी जप्त करण्यात निगडी पोलिसांना यश आले. या कारवाईत विविध नऊ पोलीस ठाण्यांतील १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील थरमॅक्स चौकात दोन अल्पवयीन मुले दुचाकीसोबत उभे असल्याचे निगडी पोलिसांना समजले. त्यावरून पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दुचाकीबाबत चौकशी करण्यात आली. त्यात ती दुचाकी चोरीची असून खोटी नंबरप्लेट लावल्याचे उघडकीस आले.
याच तपासात पोलिसांना या मुलांनी आणखी २० दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानंतर शहराच्या विविध भागातून सर्व दुचाकी जप्त केल्या. तसेच ताब्यात घेतलेल्या दोघांनी काही दुचाकी संजय लक्ष्मण गुदडावत (वय ३२, रा. भिवरेवाडी मरकळ, ता. हवेली, पुणे), शिवभगत राजकमल बिरावत (वय २८, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, पुणे), इक्बाल रामसिंह नाणावत (वय २६, रा. अष्टापूर फाटा, हवेली, पुणे) यांना विकल्या होत्या. चोरीची वाहने खरेदी केल्याप्रकरणी वरील तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे, चाकण पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, आळंदी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, डेक्कन, देहूरोड, लोणीकंद, यवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण नऊ पोलीस ठाण्यांतील १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले, निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, तात्या तापकीर, फारुख मुल्ला, नितीन बहिरट, मंगेश गायकवाड, नारायण जाधव, रमेश मावसकर, राम साबळे, जमीर तांबोळी, किशोर पढेर, विलास केकाण, मच्छिंद्र घनवट यांच्या पथकाने केली.
......................