म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात २० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:22+5:302021-05-23T04:11:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तब्बल दोन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र जीवघेण्या म्युकरमायकोसिस या ...

20 victims of mucomycosis in the district | म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात २० बळी

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात २० बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तब्बल दोन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र जीवघेण्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य जीवघेण्या रोगाच्या साथीने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गेल्या आठवड्याभरात तब्बल २० जणांचा या नव्या रोगाने बळी घेतला आहे.

कोराेनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५३ रुग्ण आढळले आहेत. तर, २४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यातील १०१ जणांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत या आजाराने ग्रस्त असलेल्या ११५ जणांवर उपचार सुरू आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात २० जणांचा मृत्यू या नव्या आजाराने झाला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या आजारावर उपचार करताना एका रुग्णाला आठ लाखांपर्यंत खर्च येत आहे. उपचारादरम्यान लागणाऱ्या इंजेक्शनचा खर्च मोठा आहे. त्यामुळे राज्य सरकारने म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्यमध्ये केला आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखापर्यंत आहे. परंतु, या आजारावरील औषध आणि इंजेक्शन मोफत मिळणार आहेत. पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळेल. म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराकरिता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत सर्जिकल पॅकेज ११ व मेडिकल पॅकेज ८ उपलब्ध आहेत. म्युकरमायकोसिस आजारापूर्वी बाधित व्यक्तीवर वा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीवर या योजनेतील उपलब्ध विमा संरक्षणापैकी काही रक्कम खर्च झालेली असू शकते. म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराकरिता महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय विमा संरक्षणापेक्षा अधिक खर्च आल्यास अधिकचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्त्वावर भागविण्यात येईल, असे राज्य सरकारने प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. यानुसार रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

चौकट

औषधे उपलब्ध होत नसल्याने धावाधाव

म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी औषधे मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. सोशल मीडियावर देखील म्युकरमायकोसिसची औषध हवी आहेत, असे संदेश दिसून येत आहेत.

औषध वाटपावर जिल्ह्याधिकाऱ्यांचे नियंत्रण

म्युकरमायकोसिस आजारावरची औषधे महाग आहेत. सर्वाधिक खर्च हा उपचारादरम्यान औषधे आणि इंजेक्शनला लागतो. ही औषधे रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे. त्या रुग्णालयाला ही औषधे देण्यात येणार आहे. पुण्यात या औषधाचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होत आहे.

अशी करा औषधांची मागणी

म्युकरमायकोसिस आजारावरील औषधे महाग आहेत. ती सहजा सहजी उपलब्ध होत नाही. त्याचा तुटवडा असल्यामुळे हे औषध उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयाने पुढाकार घेतला आहे. tinyurl.com/mmdpdh या गुगल फार्मवर अर्ज करावा लागणार आहे. या बाबतच्या पत्रव्यवहारासाठी mmdpune1@gmail.com वर नागरिकांना करावा लागणार आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांना समन्यायी पद्धतीने या औषधांचे वाटप होणार आहे.

कोट

राज्य सरकारचा निर्णय प्राप्त झाला आहे. औषधांचा साठा प्राप्त झाल्यावर औषधे पुरविण्यात येतील. सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 20 victims of mucomycosis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.