Pune News: कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीची घोषणा हवेतच
By राजू हिंगे | Updated: June 9, 2023 14:59 IST2023-06-09T14:56:01+5:302023-06-09T14:59:44+5:30
कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपीरोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे...

Pune News: कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीची घोषणा हवेतच
पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारने अखेर २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा करण्यात आली. पण या घोषणेला तीन आठवड्याचा कालावधी होउनही पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा झाले नाही.
महापालिकेत समावेश झाल्यानंतर कात्रज आणि लगतच्या गावात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती झाली. त्यामुळे बाह्यवळण रस्ताही आता कमी पडू लागला आहे. कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपीरोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक आणि पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. या रस्त्याचे काम २४१ कोटींचे असून, आतापर्यंत केवळ ४८ कोटीच खर्च झाले. भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.
या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटी हवे आहेत. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता पूर्ण, त्यापुढे काम झालेच नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे; पण त्यापुढेही काम झालेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम सलग न झाल्याने नागरिकांना याचा फारसा फायदा होत नाही.भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची अखेर रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदी केली जाणार आहे. यामध्ये सेवारस्त्याचा समावेश असला तरी सायकल ट्रॅक, पदपथ तसेच वृक्षारोपणासाठीचा ‘ग्रीन ट्रॅक’ वगळले आहे.
यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी २०० कोटी रुपये सरकारकडून घेतले जातील, महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. हा निधी मंजूर कधी होणार याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त दिले होते. अखेर पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते हा निधी पालिकेला मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल असे जाहीर केले होते. पण जुनच्या दुस०या आठवडयाला सुरवात झाली आहे. तरी हे २०० कोटी रूपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले नाहीत.