लॉकडाऊनचा हॉटेल व्यवसायाला फटका ; दीड महिन्यात २०० कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:07 PM2020-05-11T18:07:21+5:302020-05-11T18:09:01+5:30
कोरोनामुळे संपूर्ण शहरात हॉटेल व्यवसाय कुलूपबंद झाला असून अर्थव्यवस्थेचे गणितच मोडून पडले आहे.
पांडुरंग मरगजे-
पुणे : पुण्यातील खाद्य संस्कृती फार प्राचीन असून नावलौकिक प्राप्त हॉटेल व्यावसायिक आणि व्यवसाय हा शहराच्या अर्थकारणाचा कणा बनला आहे. मात्र हाच कणा लाँकडाऊनमुळे मोडून पडण्याची वेळ आली आहे. दिड महिन्यात शहरातील हॉटेलव्यवसायातील दोनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून चालक, मालक, कामगार आणि व्यवसाया संबंधित दोन लाख जणांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
शहरात काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायाची चांगलीच चलती होती. आठ हजार व्यावसायिकांनी हाँटेल असोसिएशनकडे नोंदणी केलेली आहे. शहरातील नावलौकिक प्राप्त हॉटेलने पुण्याचा आर्थिक कणा मजबूत केला होता. यावेळी कोणी स्वप्नात ही विचार केला नसेल अशी आपत्ती आली आणि त्यामुळे संपूर्ण शहरात हा व्यवसाय कुलूपबंद झाला असून अर्थव्यवस्थेचे गणितच मोडून पडले आहे.
पन्नास दिवस झाले हॉटेल व्यवसाय पूर्ण थंडावला असून कोरोना संकटाच्या गडद छायेतून बाहेर पडून या व्यवसायास पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही वर्षभराचा कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीत व्यावसायिकांचे उत्पन्न बंद असलेतरी देखभाल दुरुस्तीचा खर्च, व्यवसाय कर, लाईट बील, मेंटेनन्स सुरुच आहे. सरकारने हाँटेल व्यावसायिकांच्या अडचणी जाणून विविध प्रकारच्या कर सवलती व केंद्राकडून भरीव पॅकेज दिले तरच हा व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ शकेल असे मत हॉटेल व्यावसायिकांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.
लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिल आली असली तरी हाँटेल व्यवसाया संबंधित असून निश्चित धोरण ठरले नाही. लाँकडाऊनमुळे हाँटेल व्यवसायाला फार मोठा फटका बसला असून आता यातून सावरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दवा आणि दुवा दोन्हींची गरज आहे. गणेश शेट्टी (अध्यक्ष - पुणे रेस्टॉरंट अँन्ड हाँटेलर्स असोसिएशन)
कोरोनाच्या संकटामुळे हॉटेल व्यवसायाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. लॉकडाउन संपुष्टात आल्यानंतर हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी साधारणपणे वर्षभराचा कालावधी लागणार आहे. हॉटेल व्यवसाय हा केवळ निवास आणि भोजनाची सुविधा या पुरताच मर्यादित नसून शहराच्या पर्यटन व्यवसायाशी निगडीत आहे. हॉटेल व्यवसायाची अन्य लहानसहान व्यवसायाची सांगड आहे. ते सर्वच जण आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या साऱ्या बाबींचा सारासार विचार करून सरकारने या व्यवसायाला आर्थिक सवलती द्याव्यात. - ब्रिजेश पटेल (हाँटेल व्यवसायिक, भारती विद्यापीठ)
गेली दीड दोन महिने हॉटेल व्यावसायिक संचारबंदीच्या गर्तेत अडकले आहेत. सध्या हॉटेल व्यवसायातून उत्पन्न शून्य आहे. व्यावसायिकांनी बँकेतून कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. त्या कर्जाऊ रकमेच्या हप्त्याची परतफेड करण्यास वर्षभरासाठी स्थगिती मिळावी. सध्या व्यवसाय नसल्यामुळे व्यावसायिक कर्जाची परतेफड कशी करणार ? हॉटेलमधील उत्पन्न थांबले असले तरी देखभाल दुरुस्ती व अन्य खचार्साठी व्यावसायिकांना पैसे मोजावे लागत आहेत. सरकारने या बाबी गांभीर्याने घ्याव्यात. व्यावसायिकांना जीएसटीमधून सवलत मिळावी.
- अरुण शेट्टी (हाँटेल व्यवसायिक, धनकवडी)
---------------------------------------------