बारामतीत सिगारेटचा एक झुरका पडला २०० रुपयांना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 05:12 PM2019-07-13T17:12:21+5:302019-07-13T17:24:30+5:30

पोलिसांनी या स्मोकर्स ची वरात पोलीस ठाण्यात नेवुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे

200 hundreds fine to cigarettes smoking persons by police | बारामतीत सिगारेटचा एक झुरका पडला २०० रुपयांना 

बारामतीत सिगारेटचा एक झुरका पडला २०० रुपयांना 

Next
ठळक मुद्देशाळेच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्या स्मोकर्स पोलीसांचा दणका आता सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे झुरके सोडणाऱ्यांना दहावेळा विचार करावा लागणार

बारामती : शाळेच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्या स्मोकर्स ना बारामतीपोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सिगारेट ओढणाऱ्यांकडुन पोलिसांनी कोपटा कायद्याअंतर्गत दंड वसुल केला आहे. त्यामुळे सिगारेटच्या शौकिनांना सिगारेटचा एक झुरका २०० रुपयांना पडला आहे. पोलिसांनी या स्मोकर्स ची वरात पोलीस ठाण्यात नेवुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.या कारवाईने स्मोकर्स मध्ये खळबळ उडाली आहे.त्यांनी कारवाईचा धसका घेतला आहे. बारामतीकरांसह पालक वर्गाने पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. बारामतीत प्रथमच या प्रकारची कारवाई झाली आहे. 
बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवार (दि १२) पासुन अशा प्रकारच्या कारवाईला सुरवात केली आहे. याबाबत ' लोकमत ' शी बोलताना पोलीस निरीक्षक गोडसे यांनी  अधिक  माहिती दिली. गोडसे यांनी सांगितले की,तंबाखुजन्य पदार्थ सेवनाविरोधात कायदा आहे. या कायद्यानुसार शाळेपासुन १०० मीटरच्या परिसरात सुटी सिगारेट विकता येत नाही,त्याप्रमाणे ती ओढता देखील येत नाही,. शाळेपासुन १०० मीटरच्या आवारात ओढणाऱ्यांवर पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे.त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी(दि. १२) आणि शनिवारी (दि. १३) या दोन दिवसांत पोलिसांनी कोपटा कायद्याअंतर्गत १६ जणांवर कारवाई केली आहे.सुटी सिगारेट विक्री आणि ओढण्यास कायद्यानुसार बंदी आहे. पोलिसांनी दहा जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.त्यांच्याकडुन प्रत्येकी २०० रुपये दंड वसुल करण्यात आल्याचे गोडसे यांनी सांगितले.
दरम्यान, स्मोकर्स ना आता सिगारेटची तलफ चांगलीच महागात पडणार आहे. सिगारेट ओढतान ठिकाणाचे भान आता जपावे लागणार आहे. विशेषत: रस्त्यावर कोठेही उभा राहुन सिगारेट काढुन ती शिलगावणाऱ्या शौकिनांना त्यांची तलफ भागविताना इतरांचे भान राहत नाही.सिगारेट पेटवुन ओढताना तिच्या धुराचे वर्तुळे नाका तोंडातुन हवेत सोडण्यात स्मोकर्स धन्यता मानतात. त्या सिगारेटचा अनेकांना त्रास होतो.त्या त्रासाचे काही घेणे देणे न ठेवणाऱ्यांना आता शाळेपासुन १०० मीटरच्या आवारात सिगारेट ओढताना हजारदा विचार करावा लागणार आहे. कारण दहा रुपयांच्या सिगारेटच्या एका झुरक्यासाठी दोनशे रुपयांचा दंड तर भरावाच लागणार आहे.तो भरताना सर्वांसमक्ष पोलिसांकडुन झालेली शोभा इतरांना दाखवावी लागणार आहे. सिगारेट ओढणाऱ्या स्मोकर्सची वरात आणि त्यांना झालेला दंड बारामतीकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतुन अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण भीमराव बिबे (रा.सावळ),सागर धर्मा साबळे (रा. संदीप कॉर्नर), नवनाथ दत्तात्रय गवळी (रा. रुई पाटी),सुनील मल्हारी प्रजापती (रा.भिगवण रोड) ,बाळु जाधव (रा. एमआयडीसी), ज्ञानदेव मडके (रा. भिगवण रोड),इरफान बागवान(रा. देसाई इस्टेट),बापु दादाराम पिसाळ (रा. सीटीईन चौक), अजित तांबोळी (रा.सुर्यनगरी),मारुती वाघ(रा.सुर्यनगरी),योगेश दगडु बुदावले (रा जळोची ),मुन्नाभाई शेख (रा.रुई) धनाजी बाबुराव आटोळे (रा.सावळ), विनोद विठ्ठल गोफणे (रा.सावळ),बापु वंदन बिबे (रा. सावळ)मोहन निवृत्ती भंडलकर (रा.भिगवण रोड)यांच्यावर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
यंदा कोठेही  सिगारेट ओढणाऱ्या महाभागांना सरळ करण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे.तर  मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्रामीण पोलिसांनी रस्त्यावर कार पार्किंग करुन त्यामध्ये बसुन दारु पिणाऱ्यांना धडा शिकविला होता.कारमधील मद्यपार्टी तिघा मित्रांना चांगलेच महागात पडली होती. ३०० रुपयांच्या दारुसाठी ३ लाखांची कार पोलिसांनी त्यावेळी केलेल्या कारवाईत  जप्त केली होती.त्या कारवाईनंतर रस्त्यावर कारमध्ये बसुन मद्यपार्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. आता सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे झुरके सोडणाऱ्यांना दहावेळा विचार करावा लागणार आहे.

Web Title: 200 hundreds fine to cigarettes smoking persons by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.