तब्बल '२००' मराठी सिनेमे तयार; प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहूनच नवीन चित्रपट प्रदर्शित करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:13 PM2021-09-28T15:13:52+5:302021-09-28T15:14:31+5:30

कोरोना काळात ओटीटीकडे वळलेला प्रेक्षक पुन्हा चित्रपटागृहांकडे वळविण्याचे मोठे आव्हान सिनेमागृहांपुढे आहे

200 marathi movies ready the new film will be screened only after seeing the response of the audience | तब्बल '२००' मराठी सिनेमे तयार; प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहूनच नवीन चित्रपट प्रदर्शित करणार

तब्बल '२००' मराठी सिनेमे तयार; प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहूनच नवीन चित्रपट प्रदर्शित करणार

Next
ठळक मुद्दे बहुसंख्य निर्माते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

नम्रता फडणीस

पुणे : राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर चित्रपटगृहे खुली करण्याची घोषणा केल्याने चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण असले तरी मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये मात्र संभ्रम आहे. मराठी चित्रपटांना सुवर्णकाळ दाखविलेल्या निम्म्याहून अधिक एकपडदा चित्रपटगृहांनी कायमचे ‘दी एंड’ केले आहे. उर्वरित एकपडदा चित्रपटगृह चालकांमध्येही पडदा उघडण्याबाबत फार उत्साह नाही. प्रेक्षकांच्या प्रतिसादाची खात्री नसल्याने प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दोनशे सिनेमे कधी प्रेक्षकांसमोर येणार याबाबत अनिश्चितता आहे.

कोरोना काळात ओटीटीकडे वळलेला प्रेक्षक पुन्हा चित्रपटागृहांकडे वळविण्याचे मोठे आव्हान सिनेमागृहांपुढे आहे. त्यामुळे चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा दोन महिने अंदाज घेऊनच निर्माते नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येणाऱ्या नववर्षातच मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड वर्षात जवळपास दोनशेहून अधिक मराठी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. कोरोना महामारीमुळे या चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. अनेक निर्मात्यांनी कर्ज काढून चित्रपटांची निर्मिती केली; परंतु प्रदर्शनाअभावी निर्मात्यांचे आर्थिक दिवाळे निघाले आहेत. त्यामुळे बहुसंख्य निर्माते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

तीन कोटींचा किमान खर्च

“निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंतचा एका मराठी चित्रपटाचा खर्च हा तीन कोटी रुपयांच्या घरात आहे. आज चित्रपट तयार असूनही प्रदर्शनासाठी कित्येक निर्मात्यांकडे पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. नवा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ‘प्रमोशन’साठी काही कालावधी असावा लागतो. प्रमोशनसाठी पार्टनर घेण्याशिवाय पर्याय नसतो. तो सध्याच्या परिस्थितीत मिळेल याची खात्री नाही. ही सगळी गणिते जुळली तरच नवीन चित्रपट प्रदर्शित करता येईल. प्रेक्षकसुद्धा चित्रपटगृहात येण्यास किती प्रतिसाद देतात त्यावर सगळे अवलंबून आहे असं निर्माते विश्वास सुतार यांनी सांगितलं.'' 

खेळ सोपा नाही

“चित्रपटगृहे उघडली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद जोपर्यंत मिळत नाही तोवर निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस दाखविणार नाहीत. गेल्या दीड वर्षातले दोनशेपेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत; पण चित्रपट प्रदर्शित करणं एवढी सोपी गोष्ट नाही. प्रसिद्धी साहित्य, जाहिराती यावर खूप खर्च होतो. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळण्याची निर्मात्यांना खात्री नाही. प्रेक्षक कितपत साथ देतील त्यावर सर्व अवलंबून असल्याचं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितलं.''

मल्टीप्लेक्स उघडणार

“शासनाने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे १ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी कामावर बोलावणार आहेत. शासनाने अजून नियमावली जाहीर केलेली नाही. ती आली की, त्यानुसार नियोजन केले जाईल. दिवाळीमध्येच नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आम्ही रंगीत तालीम म्हणून दोन आठवडे आधीच चित्रपटगृह सुरू करणार आहोत असं सिटीप्राईड मल्टिप्लेक्सक्सचे अरविंद चाफळकर म्हणाले आहेत”

Web Title: 200 marathi movies ready the new film will be screened only after seeing the response of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.