पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील २०० जागा महिनाभरात भरल्या जाणार

By निलेश राऊत | Published: December 15, 2023 05:39 PM2023-12-15T17:39:04+5:302023-12-15T17:42:07+5:30

आता ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्याने येत्या महिनाभरात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले....

200 posts in the fire brigade of Pune Municipal Corporation will be filled within a month | पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील २०० जागा महिनाभरात भरल्या जाणार

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील २०० जागा महिनाभरात भरल्या जाणार

पुणे : महापालिकेच्या अग्निशमन दलातील रिक्त असलेल्या ५६२ पदांपैकी २०० फायरमन पदे येत्या महिनाभरात भरली जाणार आहेत. महिला उमेदवारांच्या भरतीमध्ये काही प्रकरणे ही आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयात गेल्याने व पावसाळ्यात फिटनेस टेस्ट होऊ न शकल्याने नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणारी ही भरती प्रक्रिया लांबली गेली होती. मात्र आता ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्याने येत्या महिनाभरात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.

तुटपुंज्या मनुष्यबळाअभावी महापालिकेचे आधीच कमी असलेली अग्निशमन दलाची केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकत नाहीत. ही बाब अग्निशमन दलासह महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासनाला कळविली होती. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी शासनाने आर.आर.नुसार ही पदे भरण्यास तत्वत: मान्यता दिली व गेल्या वर्षी तसे आदेश दिले. यामध्ये काही पदे पदोन्नतीने तर फायरमनची पदे नव्याने भरण्याचे आदेश दिले. फायरमनची पदे भरताना माजी सैनिक, महिला गट यांमधील रिक्त जागाही नमूद नियमावलीनुसार भरण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिकेने ही प्रक्रिया सुरू केली. परंतु, काही महिला उमेदवार भरती प्रक्रियेत न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया लांबली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित महिलांची पुर्नप्रवेश प्रक्रिया पूर्ण करून, फिटनेस टेस्टही पूर्ण झाली आहे. तर माजी सैनिकांच्या भरतीची अडचणही दूर झाली असल्याने या दोन घटनांमुळे रखडलेल्या एकूण २०० फायरमन पदाची भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात ही भरती पूर्ण होऊन अग्निशमन दलाला नवीन २०० फायरमन मिळतील असा विश्वास सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

सध्याचे अग्निशमन दलातील मनुष्यबळ - 

मनुष्यबळाअभावी तुटपुंज्या क्षमतेवर सध्या महापालिकेची अग्निशमन दलाची केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रावर प्रत्येक शिफ्टमध्ये ९ असे तीन शिफ्टमध्ये २७ जणांची आवश्यक आहे. यामध्ये एका शिफ्टमध्ये १ लिडिंग फायरमन, ७ फायरमन व १ चालक यांची आवश्यकता आहे. परंतु, काही अपवाद वगळता सध्या केवळ ३ ते ४ जण एका शिफ्टमध्ये केंद्रात कार्यरत असल्याचे वास्तव आहे.

अग्निशमन दलाकडे मंजूर पदे - ९१०
कार्यरत - ३४८

रिक्त - ५६२

Web Title: 200 posts in the fire brigade of Pune Municipal Corporation will be filled within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.