पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वसतीगृहामधील २०० क्वारंटाईन नागरिकांचा जेवण वेळेत न मिळाल्यामुळे संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 11:46 PM2020-04-22T23:46:01+5:302020-04-22T23:46:35+5:30
मागील दोन दिवसांपासून येथे क्वॉरंटाईन करुन ठेवलेल्या नागरिकांचे हाल सुरु
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी अधिकच वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात येत आहे. वडगाव येथील सिंहगड इन्सिट्युटच्या पन्हाळा वसतीगृहामध्ये जवळपास 200 लोकांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असून या नागरिकांना जेवण वेळेत मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वसतीगृहामध्ये शहराच्या विविध भागामधून जवळपास 200 नागरिकांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये अगदी एक वर्षाच्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून येथे ठेवलेल्या नागरिकांचे हाल सुरु आहेत. या नागरिकांना सकाळचा चहा आणि न्याहरी दुपारी एक वाजता मिळाली. तर, मंगळवारी रात्रीचे जेवण मध्यरात्री बाराच्या सुमारास पोचविण्यात आले. पालिकेने या विलगीकरण कक्षाची जबाबदारी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकाºयांकडे सोपविलेली आहे. परंतू, पालिकेचा उदासिन आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
याठिकाणी विलगीकरण करुन ठेवण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या महिलांची आहे. या नागरिकांना खिचडी भात पुरवला जात आहे. त्यानेही भूक भागेल याची शाश्वती देता येत नाही. नागरिकांना जिन्यामध्ये आणि मोकळ्या व्हरांड्यात रांगेत उभे करुन वसतीगृहाच्या बाहेर बोलावून खिचडी वाटप केले जात आहे. या वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळले जात नाहीत. अधिकारी इमारतीच्या गेटच्या बाहेर उभे राहून कर्मचाºयांना सूचना देऊन बाहेरुनच निघून जातात. ना नागरिकांशी कोणता संवाद साधला जात आहे ना कोणती काळजी घेतली जात आहे. कोंबड्या-बकºया कोंबाव्यात तशी माणसे याठिकाणी कोंबण्यात आली आहेत. याकडे पालिकेच्या क्षेत्रीय अधिका-यांपासून वैद्यकीय अधिका-यांचेही दुर्लक्ष होत आहे.
======
मंगळवारी दिवसभरात येथे ठेवलेल्या नागरिकांना जेवणच देण्यात आले नव्हते. रात्री उशिरापर्यंत जेवण मिळालेले नव्हते. रात्री साडेअकरा वाजता नागरिकांनी पालिकेच्या काही वरिष्ठ अधिका-यांना संपर्क साधला. त्यानंतर, सूत्रं हलल्यावर मध्यरात्री बाराच्या सुमारास सर्वांना तांदळाची खिचडी पाठविण्यात आला. तोपर्यंत नागरिक भुकेने व्याकूळ झाले होते.
======
आम्हाला दोन दिवसांपासून येथे आणून ठेवले आहे. माज्या कुटुंबातील एकूण अकरा जण आहेत. यासोबतच जवळपास 200 नागरिक याठिकाणी आहेत. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. परंतू, प्रशासन अत्यंत निर्दयीपणे वागत आहे. जनावरांना द्यावी तशी वागणूक आम्हाला दिली जात आहे. सकाळचा चहा नाश्ता दुपारी देतात, दुपारचं जेवण संध्याकाळी आणि मध्यरात्री दिलं जातं. मोठी माणसं कसेबसे भुकेवर नियंत्रण ठेवतील परंतू लहान मुलांचे काय? त्यांनी काय खायचे? फार असंवेदनशील कारभार सुरु आहे.
- रविंद्र मोरे, गुलटेकडी
......