ऑनलाइनमुळे २,००० जोडप्यांच्या लग्नाची लाइन झाली क्लीअर; नव्या प्रणालीला उत्तम प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:48 AM2023-10-22T05:48:21+5:302023-10-22T05:48:39+5:30
‘आयटी हब’ आणि ऑनलाइनचा वापर करण्यात आघाडीवर असलेल्या पुण्याने बाजी मारली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ‘नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागा’ने ऑनलाइन विवाह नोंदणीसाठी जूनमध्ये नव्याने सुरू केलेल्या प्रणालीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे १ हजार ९१९ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
‘आयटी हब’ आणि ऑनलाइनचा वापर करण्यात आघाडीवर असलेल्या पुण्याने यातही बाजी मारली असून, सर्वाधिक ९३८ ऑनलाइन नोंदणी एकट्या पुण्यात झाली आहे. पुण्यानंतर ठाण्यात २५७ ऑनलाइन विवाह झाले आहेत.
नोंदणी मुद्रांक विभागाने विवाह नोंदणीसाठी २.० ही ऑनलाइन प्रणाली जूनपासून पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांमध्ये सुरू केली असून, यामुळे विवाहासाठी नोटीस दिल्याचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच दोन महिन्यांत कधीही लग्नाची तारीख ऑनलाइन ठरविणे शक्य झाले आहे.
४ हजार जणांनी दिली नोटीस
राज्यात ४ हजार ३९ जणांनी विवाहासाठी नोटीस दिली. गेल्या वर्षी राज्यात ३६ हजार विवाहांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ७ हजार ९०० पुण्यात व मुंबईत सुमारे ७,६०० विवाहांची नोंदणी झाली होती.
पुणे जिल्ह्यात जूनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया सुरू झाली. पुढे नोंदणी विभागाने राज्यात ऑनलाइन सुविधा सुरू केली. ३६ कार्यालये वेबसाइटला जोडण्यात आली. - अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक.