2014 मध्ये भोसरीसह खेड, शिरूरमध्ये आढळरावांना होते मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:53 AM2019-03-23T00:53:01+5:302019-03-23T00:53:52+5:30

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला.

In 2014, there was a lot of frustration in the villages of Khed, Shirur with Bhosari | 2014 मध्ये भोसरीसह खेड, शिरूरमध्ये आढळरावांना होते मताधिक्य

2014 मध्ये भोसरीसह खेड, शिरूरमध्ये आढळरावांना होते मताधिक्य

googlenewsNext

- निनाद देशमुख

पुणे  -  शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला. त्यांना भोसरी, खेड आळंदी, हडपसर, शिरूर विधानसभा संघातून मोठी आघाडी मिळाली. मात्र, त्यांच्या घरच्या आंबेगाव मतदार संघातून कमी मते मिळाली. पाच विधानसभा मतदारसंघात आणि जिल्हा परिषद गटांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतांनाही देवदत्त निकम यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ६ लाख ४३ हजार ४१५ मते मिळाली. देवदत्त निकम यांना ३ लाख ४१ हजार ६०१ मते मिळाली. मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड हे ३६ हजार मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले.

दोन्ही उमेदवारांना आंबेगाव तालुक्यातून जवळास समान मते
२०१४ मध्ये दोन्ही उमेदवार आंबेगावचे असतानाही आढळराव यांना ९८ हजार १७७ मते तर देवदत्त निकम यांना ८९ हजार ५९४ मते मिळाली होती. इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा कमी मताधिक्य आढळराव यांना मिळाले.

जुन्नरमधील शिवसेनेचा प्रभाव ठरला निर्णायक
जुन्नर तालुक्याने तीन निवडणुकांमध्ये आढळराव पाटलांना कायम मताधिक्य दिले आहे. गेल्या निवडणुकीत पाटील यांना ९७ हजार ३०९ एवढी मते मिळाली. निकम यांना ७१ हजार ७६५ मते मिळाली होती.

राष्ट्रवादीचा प्रभाव काढला मोडीत
गेल्या तीनही निवडणुकांमध्ये खेड तालुक्याने आढळराव पाटील यांना मताधिक्य दिले आहे. २०१४ ला आढळराव पाटील यांना १ लाख ११ हजार ५३६ तर निकम यांना ४९ हजार ८७५ मते मिळाली. आढळरावांच्या तुलनेत निकम यांना निम्म्याहून कमी मते पडली. निवडणुकीचा निकाल फिरविण्याची ताकद या मतदारसंघात आहे.

शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या
वर्चस्वला शिवसेनेचा दे धक्का!

शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. तरीही या तालुक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिन्ही निवडणुकीत मोठे मताधिक्य आहे. आढळराव यांना १ लाख ९ हजार ४७१ मते मिळाली तर निकम यांना केवळ ५४ हजार १७१ मते मिळाली.

प्रभावी जनसंपर्क नसतानाही
हडपसरमधून सर्वाधिक मताधिक्य

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला हडपसर मतदारसंघात पिछाडीवर टाकत या मतदारसंघातून जवळपास लाखाच्या वर मते मिळवली. आढळराव पाटील यांना १ लाख ७ हजार ३२५ व निकम यांना ५१ हजार ५७१ मते मिळाली. येथे देखील त्यांनी ५५ हजार ७५४ मते अधिक मिळविली.
शिवाजीराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसची या मतदारसंघात ताकद असताना आत्तापर्यंत त्यांना विजय मिळविता आलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. आंबेगाव वगळता पाचही मतदारसंघात शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष युतीचे आमदार आहेत. जुन्नरमधून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भोसरीमध्ये निवडणुकीनंतर भाजपावासी झालेले महेश लांडगे, हडपसरमध्ये भाजपाचे योगेश टिळेकर, हडपसरमध्ये भाजपाचे बाबुराव पाचर्णे आणि खेड-आळंदीमध्ये शिवसेनेचे सुरेश गोरे आमदार आहेत. आंबेगाव या एकमेव मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे आमदार आहेत. लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणिते ठरणार असल्याने सर्वच तालुक्यांतील दोन्ही पक्षांच्या दिग्गजांची कसोटी लागणार आहेत.

Web Title: In 2014, there was a lot of frustration in the villages of Khed, Shirur with Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.