2022 Round up: पुणे शहरात कोरोना निर्बंधमुक्तीनंतर गुन्ह्यांत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 08:49 AM2023-01-02T08:49:39+5:302023-01-02T08:51:55+5:30
पुणे शहरातून वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये दरदिवशी मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे...
पुणे : कोरोना निर्बंधामुळे मागील दोन वर्षांत गुन्हेगारीत काही प्रमाणात घट झाली. गेल्या वर्षी २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी काही वर्षांपूर्वी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या असंख्य घटना घडत होत्या. अशा चोरट्यांवर आंतरजिल्हा समन्वयातून कारवाई केली गेल्याने त्याची जागा आता मोबाईलच्या जबरी चोरीने घेतली आहे.
दररोज ६ वाहने चोरीला
पुणे शहरातून वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये दरदिवशी मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षभरात तब्बल १९१० वाहने चाेरीला गेली. ही संख्या २०२१ मध्ये १५०२ होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल अडीच हजारांनी वाढ झाली आहे. काही वेळा तर एकाच दिवशी १० वाहने चोरीला गेल्याच्या नोंदी झाल्या आहेत.
महिलांना क्रूर वागणूक देणे, विनयभंग करणे, बलात्कार अशा महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दररोज एक गुन्ह्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अडीच हजार गुन्हे वाढले
गेल्या दोन वर्षांचा आढावा घेतल्यास भाग १ ते ५ मधील गुन्ह्यांत तब्बल अडीच हजार गुन्हे वाढले आहेत. २०२१ मध्ये ८ हजार ६४ गुन्हे दाखल होते. ते २०२२ मध्ये १० हजार ५६७ झाले आहेत. त्याच वेळी जुगार, दारूविषयी कारवाई कमी झाल्याचे दिसून येत आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान शहरात दाखल गुन्हे
गुन्हा २०२२ २०२१
खून ९४ ८४
खुनाचा प्रयत्न ३२८ २९०
सोनसाखळी ६७ ८१
मोबाइल चोरी १३२ ९४
जबरी चोरी २१८ १७५
घरफोडी ६१२ ४३५
दुखापत १०८४ ९२१
विवाहितेचा छळ ४८० ३२७
बलात्कार ३०५ २२९
विनयभंग ५७८ ३८५
फसवणूक ९८२ ७१५
चोरी १३३८ ८४१
वाहनचोरी १९१० १५०२
प्राणघातक अपघात ३०७ २२४