२०५० पर्यंत प्रत्येक सहा व्यक्तींमध्ये एकाला कॅन्सर अन् एकाला मधुमेहाचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:39+5:302021-09-02T04:20:39+5:30
पुणे : सध्या युरोपियन कमिशनअंतर्गत ‘कॅन्सर मिशन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत आरोग्याचा पुढील ५० वर्षांचा प्लॅन ...
पुणे : सध्या युरोपियन कमिशनअंतर्गत ‘कॅन्सर मिशन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत आरोग्याचा पुढील ५० वर्षांचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. त्यानुसार युरोपमध्ये २०५० पर्यंत दोनपैकी एक व्यक्तीला, तर भारतात सहापैकी एका व्यक्तीमध्ये कॅन्सरचे निदान होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. बदलती जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी, अनियमित आहार, अपुरी झोप ही यामागील कारणे आहेत, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आरोग्य या विषयावर शासनाकडून ठोस धोरण तयार होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राजकारणी ‘पॉलिसी मेकर’ व्हावे लागतील, हेही त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. नानासाहेब थोरात यांनी मंगळवारी (३१ ऑगस्ट) लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कॅन्सर प्रकल्प आणि संशोधन, आरोग्याला मिळत असलेले दुय्यम महत्व, कोरोनामुळे झालेले सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक नुकसान, भारतात संशोधनाबाबत असलेली उदासीनता अशा विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला.
कॅन्सर, अल्झायमर, डायबेटिस यांसारख्या आजारांसाठी भविष्यात ‘टार्गेटेड थेरपी’ हाच उपाय पुढे येईल. मधुमेही व्यक्तीमध्ये थेट स्वादूपिंडाजवळ इन्सुलिन दिले जाऊ शकेल. कॅन्सरही ज्या भागात पसरला आहे, तिथे थेट औषध पोहोचवता येऊ शकेल, असे सूतोवाचही त्यांनी केले.
डॉ. थोरात म्हणाले, ‘भारतामध्ये २०५० पर्यंत सहा कुटुंबांच्या व्यक्तीमध्ये एका व्यक्ती कर्करोगग्रस्त आणि एका व्यक्तीला मधुमेहग्रस्त असेल, असा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आपली जीवनशैली कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण देत आहेत. अपुरी झोप, अवेळी आहार, जंकफूडचे सेवन, पर्यावरणापूरक गोष्टींचा अभाव या सवयींमधून आपण कॅन्सरकडे जाणाऱ्या पायऱ्या चढत आहोत. आपल्या मेंदूला आराम मिळाल्यावर तो सक्रिय होऊन शरीरातील दोष शोधत असतो. आजकाल मेंदूला आरामच मिळत नसल्याने त्याला सक्रिय होऊन दोष शोधण्यास वेळ मिळत नाही. कॅन्सरवरील केमोथेरपी, रेडिएशन या उपचारपध्दतींवर आमचे संशोधन सुरू आहे. या उपचारांचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि त्यातून कॅन्सरपासून पूर्णत: मुक्ती मिळणे शक्य नाही.’
‘कॅन्सरचे निदान पहिल्या टप्प्यात होण्याचे प्रमाण नगण्य आहे. युरोप, अमेरिकेमध्ये अद्ययावत चाचण्या उपलब्ध असल्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये निदान शक्य होते. भारतात लक्षणे दिसू लागल्यावर तिसऱ्या टप्प्यामध्ये कॅन्सरचे निदान होते. सध्याच्या कॅन्सर थेरपी फार्मा बेस्ड आहेत. आम्ही आॅक्सफर्ड विद्यापीठात सध्या फिजिक्स बेस्ड थेरपींवर संशोधन करत आहोत. यामध्ये ‘कॅन्सर टार्गेटेड’ ड्रग वापरून, उष्णतेच्या माध्यमातून रुग्णांमधील थेरपींचे दुष्परिणाम कसे कमी करता येतील, थेट ट्युमरवर हल्ला कसा करता येईल, यावर अभ्यास सुरू आहे. केमोथेरपीसारख्या उपचारांमधील औषधे किडनी, लिव्हरसारख्या अवयवांवर परिणाम करतात. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून थेट ट्युमरवर निशाणा साधण्याच्या दृष्टीने थेरपी विकसित केल्या जात आहेत.’
----
कॅन्सर आणि कोविड म्हणजे दुहेरी संकट
कोविड काळात युरोपमध्ये तब्बल १० लाख लोकांच्या कॅन्सर तपासण्या लांबणीवर पडल्या. भारतातही कॅन्सर रुग्णांना एक-दीड वर्षापासून थेरपी मिळालेल्या नाहीत. युरोपमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ, अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूल, इटलीमधील ट्रिस्टि विद्यापीठ, अमेरिकेतील येल, पर्डू आणि विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी कोव्हिड आणि कॅन्सर यांचे जागतिक समीकरण मांडणारा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार, कोविडमुळे झालेल्या मृत्यूमध्ये २५ रुग्ण हे कॅन्सरचे आहेत, अमेरिकेत हेच प्रमाण २८, युरोपमध्ये २२, इराणमध्ये २९, भारतामध्ये १६, तुर्कीमध्ये २५ ब्राझीलमध्ये १२ आणि चीनमध्ये १७ एवढे आहे. २०२० मध्ये इंग्लंडमध्ये कॅन्सर रुग्णांची हॉस्पिटलमधील भरती ८४ टक्क्यांनी कमी झाली. अमेरिकेत ४६ टक्के तर भारतात हेच प्रमाण ५० टक्के एवढे होते, म्हणजेच कोविडमुळे भारतातील १०० कॅन्सर रुग्णांपैकी ५० रुग्णांना हॉस्पिटल मध्ये योग्य वेळेत उपचारच मिळाले नाहीत, चीन आणि आफ्रिकन देशांमध्ये हेच प्रमाण फक्त १० टक्के एवढेच होते.
फोटो - नानासाहेब थोरात -१
नानासाहेब थोरात-२