७२ लाख पुणेकरांना २०.९० टिएमसी पाणी दयावे; पाण्याच्या अंदाजपत्रकाद्वारे महापालिकेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 04:43 PM2023-07-16T16:43:02+5:302023-07-16T16:43:29+5:30
गेल्या वर्षी २०२३-२४ यावर्षासाठी २०.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या लोकसंख्येत सरासरी दोन टक्के वाढ गृहीत धरली जाते
पुणे : पुणे महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुण्याच्या ७२ लाख लोकसंख्येचा विचार करून जलसंपदा विभागाने २०२३-२४ या वर्षासाठी २०.९० टीएमसी पाणी उपलब्ध करून दयावे अशी मागणी पुणे महापालिकेने पाण्याच्या अंदाजपत्रकाद्वारे केली आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहराला खडकवासला , पानशेत, वरसगाव, टेमघर, भामा आसखेड या धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेचा पाटबंधारे विभागासोबत झालेल्या करारानुसार १२.४१ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाते. पण समाविष्ट झालेल्या ३४ गावे यामुळे पाण्याची मागणी दरवर्षी वाढत आहे. गेल्यावर्षी २०२३-२४ यावर्षासाठी २०.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या लोकसंख्येत सरासरी दोन टक्के वाढ गृहीत धरली जाते. त्यामुळे पुढील वर्षभरात किमान ७२ लाख लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. तसेच पाणी गळती ३५ टक्के ग्राह्य धरून महापालिकेने २०.९० टीएमसी पाण्याची मागमी केली आहे.
गळतीचे प्रमाण २० टक्के कमी
पुणे महापलिकेच्या हद्दीमधील पाणी पुरवठयाची वितरण व्यवस्था जुनी आहे. त्यामुळे पाण्याच्या गळतीचे प्रमाण सुमारे ३५ टक्के आहे. पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी समान पाणी पुरवठा योजने अंर्तगत नवीन जलवाहिन्या टाकल्या जात आहे. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण कमी करून ते २० टक्कापर्यत कमी करण्यात येणार आहे.