शिरुर तालुक्यातील निमोणेत २१ बोटींना जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:39 PM2019-11-13T12:39:57+5:302019-11-13T12:42:51+5:30
वाळूमाफियांचे १ कोटी १० लाखांचे नुकसान
शिरूर/निमोणे : पिंपळाचीवाडी व दाणेवाडी परिसरात घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या तब्बल २१ बोटी फोडल्या. शिरूर व श्रीगोंदा महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत वाळूमाफियांचे तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
निमोणे (ता. शिरूर) नजीक पिंपळाचीवाडी तसेच दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) हद्दीतील घोड नदीच्या पात्रामध्ये गेली काही दिवसांपासून वाळूमाफियांनी अवैधपणे वाळूउपसा आणि वाहतुकीचा सपाटा लावला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या कामांमध्ये महसूल तसेच पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने वाळूमाफियांनी शासकीय यंत्रणांना आव्हान देत उघडपणे तस्करी सुरू केली होती.
यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून कोट्यवधी रुपयांची लूट चालू होती. नदीपात्राचे लचके तोडत, अवजड वाहनांच्या साहाय्याने वाहतूक करताना रस्त्याचीही माफियांनी वाट लावली होती.
शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख, बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने, शिरूरचे मंडलाधिकारी नीलेश घोडके, तलाठी सुशीला गायकवाड, ललिता वाघमारे, पो. नि. अरविंद माने, पो.स.ई. बोराडे, पो.ना. नंदकुमार पठारे, पो.शि. दादासाहेब क्षीरसागर, पो. शि. संपत गुंड, पो. शि. विकास कारखिले, पो.शि. चालक म्हस्के, संजय सातव, पोलीस उपअधीक्षक, कर्जत उपविभाग यांनी ही कारवाई केली.
............
शिरूरचे यापूर्वीचे तहसीलदार भोसले यांनी वेळोवेळी कारवाई करत वाळूमाफियांना जेरीस आणले होते. मात्र, भोसले यांची बदली होताच वाळूचोरांनी डोके वर काढले होते. निवडणुकीच्या कामातून उसंत मिळताच परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी (दि. १२) सुट्टीचा दिवस असूनही शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख यांच्या पथकाने वाळूउपसा करणाºया बोटीवर धडक ‘हल्लाबोल’ करत तब्बल २१ बोटी जाळून नष्ट केल्या. यामध्ये वाळूचोरांचे तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले. या धडक कारवाईने वाळूमाफियांना चांगला ‘दणका’ दिला आहे.