२१ सेंटर्स, १५ एजंट आणि २,७०० बनावट प्रमाणपत्रे, उच्चशिक्षित सय्यद इम्रानचे मोठे कारनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:53 AM2023-05-10T05:53:32+5:302023-05-10T05:54:50+5:30
लॅपटॉपच्या तपासात आतापर्यंत २ हजार ७०० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले.
पुणे : एमबीएचा विद्यार्थी असलेल्या सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम याने बनावट वेबसाईट तयार करून दहावी, बारावी ते थेट पदवीपर्यंतची बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी १५ एजंटांची नेमणूक केली होती. त्यासाठी २१ ठिकाणी सेंटर्स सुरू केली होती. त्याच्या लॅपटॉपच्या तपासात आतापर्यंत २ हजार ७०० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले.
संदीप कांबळे (रा. सांगली), कृष्णा गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सय्यद सय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, सय्यद हा त्यांचा सूत्रधार आहे. यू-ट्यूबवर पाहून त्याने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल आणि ए-१ हिंद युनिव्हर्सिटी अशा नावाने दोन फेक वेबसाईट बनविल्या. ओपन स्कूलच्या नावाने तो १० वी, १२ वीचे प्रमाणपत्र देत असे, तर पदवी व इतर प्रमाणपत्रे ए-१ हिंद युनिव्हर्सिटीच्या नावाने देत असे.
दुसरा मोठा घोटाळा
पुणेपोलिसांनी दोन वर्षांपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा उघडकीस आणला होता. त्यात बनावट प्रमाणपत्र मिळविलेल्या ७ हजार ८०० जणांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हा आणखी एक मोठा घोटाळा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे.