Pune: गुरुवारी पुणे शहरात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे २१ ठिकाणी झाडपडीच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:13 AM2024-05-10T11:13:26+5:302024-05-10T11:14:27+5:30
या झाडपडीच्या घटनांमध्ये अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती....
पुणे : शहरात अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे २१ वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. गुरूवारी (दि. ९) दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अग्निशमन विभागाला २१ कॉल आले. या झाडपडीच्या घटनांमध्ये अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
गुरूवारी दुपारी जिल्ह्यासह शहरात खडकवासला, धायरी, वारजे, शिवाजीनगर, कात्रज आणि कोरेगाव पार्क परिसरात अवकाळी पाऊस पडला. त्याचदरम्यान सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर, वाहनांवर पडल्या. यामुळे अग्निशामक विभागाची चांगलीच धावपळ झाली.
याठिकाणी झाल्या झाडपडीच्या घटना...
सारंग सोसायटी - सहकारनगर, शेलार मळा - कात्रज, पद्मावती मंदिर - सातारा रोड, हेलिऑन शाळेजवळ - सिंहगड रोड, मॉडल कॉलनी - शिवाजीनगर, महात्मा सोसायटी - कोथरूड, शारदा निकेतन मुलींचे वसतिगृह - कर्वेनगर, डीपी रोड - कोथरूड (येथील ५ चारचाकी वाहनांवर झाड पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले), दांगट पाटील इंडस्ट्रियल इस्टेट - शिवणे, विद्युतनगर सोसायटी - कोरेगाव पार्क, जैन मंदिरजवळ - भवानी पेठ, हॉटेल वैशाली मागे - फर्ग्युसन रस्ता, सेवासदन शाळेजवळ - एरंडवणा (येथेही चारचाकी वाहनावर झाड पडले), साईबाबा मंदिराजवळ - टिंगरेनगर, सुस रोड - पाषाण, नामदेवनगर - वडगाव शेरी, तेजसनगर - कोथरूड (येथेही वाहनांवर झाडपडीची घटना), राहुलनगर - कोथरूड, सेनापती बापट रस्ता, डहाणूकर कॉलनी - कोथरूड आणि नाना पेठ पोलिस चौकीसमोर झाडपडीच्या घटना घडल्या.