२०२१ मध्ये २१ वेळा केले २१ किमी ‘रन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:16+5:302021-07-07T04:14:16+5:30
------------------------ पुणे : ‘आयुष्यात ज्या गोष्टी आवडतात त्या माणसांनी मनसोक्त कराव्यात. दीड-दोन वर्षांपासून मला धावणे हा व्यायामाचा प्रकार आवडायला ...
------------------------
पुणे : ‘आयुष्यात ज्या गोष्टी आवडतात त्या माणसांनी मनसोक्त कराव्यात. दीड-दोन वर्षांपासून मला धावणे हा व्यायामाचा प्रकार आवडायला लागला. सकाळी धावल्यावर मला मनस्वी आनंद जाणवायला लागला आणि मी धावत राहिले. २०२१ मध्ये आपण २१ वेळा २१ किमी (हाफ मॅरेथॉन) धावायला हवे असे वाटायला लागले. जानेवारीपासून धावायला सुरुवात केली आणि ३० जूनला मी कोणत्याही दुखापती आणि थकव्याविना ही धाव पूर्ण केली’. ही वाक्य आहेत केवळ दीड-दोन वर्षांपूर्वीच धावण्याचा सराव सुरू केलेल्या पस्तिशीतल्या सीमा ननवरे हिचे.
एकीकडे कोरोनाने अनेकांच्या मनाला निगेटिव्हिटीने ग्रासले असताना पुण्यातील नांदेड सिटी येथील सीमा ननवरे या मुलीने धावण्याचा एक वेगळा विक्रम केला. अगदी उणेपुरे दोनच वर्षांपासूनच धावण्याचा सराव सुरू केला असताना आणि २०२१ मध्ये सीमाने तब्बल २१ वेळा २१-२१ किमीची (हाफ मॅरेथॉन) धाव पूर्ण केली.
या आगळ्या ॲचिव्हमेंटबद्दल ‘लोकमत’शी बोलताना सीमा म्हणाल्या की, मी पूर्वीपासून फिटनेसबाबत दक्षता घेते. आधी जिम वगैरे करायचे. २०१८ मी विप्रोमधील जॉब सोडला त्याचवेळी मला पहिल्यांदा नांदेड सिटी येथील एनसी रनर्स ग्रुपबद्दल माहिती झाले. त्या ग्रुपमध्ये मी अनेक धावपटूंबरोबर धावायला लागले, त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली आणि मला धावायची प्रचंड आवड लागली. नंतर कोरोनामुळे सारं काही ठप्प झाले. पण माझ्या धावण्याची आवड मला शांत राहू देत नव्हती, त्यामुळे मी घरात हॉलमध्येच धावायला सुरुवात केली. अनेकदा तर मी हॉलमध्ये गोल गोल फिरत २१ किमी धावले आहे. २०२१ या सालाच्या आकड्यामध्ये २१ हा आकडा आहे आणि २१ किमी म्हणजे हाफ मॅरेथॉनचा अंक त्यामुळे आपण याच्याशी मिळताजुळता असे काही वेगळे करावे, त्यामुळे मी २१ वेळा २१ किमी धावायचे ठरवले. धावण्याचा केवळ आनंद घ्यायचा या उद्देशाने मी धावत राहिले, त्यामुळे मी वेळ आणि पेस याकडे फारसे लक्ष दिले नाही.
--
चौकट
साखर सोडल्यामुळे वजन कमी झाले
-
मला गोड खायला प्रचंड आवडत होते, त्यामुळे कितीही धावले तरी माझे वजन कमी होत नव्हते. खूप मोठा निश्चय करून मी जानेवारीपासून गोड खायचे पूर्ण वर्ज्य केले, त्या जोडीला धावणे सुरू झाले त्यामुळे माझे वजनही झपाट्याने उतरले. त्याबरोबर मी डायटिंगही सुरू केले होते. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण आणि सायंकाळी साडेपाच वाजता रात्रीचे जेवण, त्यानंतर मी काहीच खात नाही.