पुण्याला २१ टीएमसी पाणी द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी
By राजू हिंगे | Published: July 18, 2023 10:16 PM2023-07-18T22:16:57+5:302023-07-18T22:17:35+5:30
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.
राजू हिंगे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील बहुचचित समान पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट आहे. त्यामुळे ही योजना लवकर पुर्ण करावी. पुणे शहराला २१ टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी कसबा पेठ विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी तारांकित प्रश्नादारे केली. त्यावर पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. त्यात टॅकर माफियावर नियंत्रण आणावे. स्वच्छ पाणी पुरवठा करावा.समान पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी धंगेकर यांनी केली मंत्री उदय सामंत म्हणाले, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
महापालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.