७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 12:51 PM2024-08-07T12:51:30+5:302024-08-07T12:52:29+5:30
पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली
पुणे: पुणे महापालिका हद्दीत ३४ गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून शहराला २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. नोकरी, शिक्षक, व्यवसायानिमित्त शहरात दररोज ये-जा करणारे नागरिक आदी गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७९ लाख ३९ हजार ९७४ इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेला दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे लागते. त्यानुसार पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली आहे.
पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड धरण, रावेत बंधारा या ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो; पण शहराचा बहुतांश भाग खडकवासला धरण प्रकल्पावर अवलंबून आहे. शहरात नोकरी, शिक्षक, व्यवसायासाठी रोज ये-जा करणारे नागरिक यांना गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७९ लाख ३९ हजार ९७४ इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. तसेच पाणी गळती ३५ टक्के ग्राह्य धरून २०२४-२५ या वर्षासाठी पाणीपुरवठा विभागाने २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केले आहे.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे अशी एकूण ३४ गावे समाविष्ट झालेली आहेत. या गावांची लोकसंख्या ११ लाख १४ हजार ७१४ इतकी गृहीत धरून पाण्याची मागणी केली जात होती; पण महापालिकेने केलेल्या सुधारित अभ्यासात ३४ गावांची लोकसंख्या १८ लाख ११ हजार ३४० इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये धायरी, नांदोशी, नांदेड, कोंढवे धावडे, आंबेगाव खुर्द, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा-केशवनगर, मांजरी या गावांची लोकसंख्या आठ लाख ३१३ इतकी आहे. येथे बल्क मीटरनुसार प्रतिमानसी १२० लिटर प्रतिदिन पाणी दिले जाते, तर उर्वरित गावांमध्ये १० लाख ११ हजार २६ इतकी लोकसंख्या आहे. या भागात जलवाहिनीचे प्रमाण कमी असल्याने टँकरची संख्येत ४० टक्क्यांनी वाढ केली आहे.
पाण्याची गळती होणार कमी
महापालिका हद्दीमधील वितरण व्यवस्था जुनी असल्या कारणाने पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्के आहे. पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे.
असे आहे पाण्याचे अंदाजपत्रक
जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा - ११.१७ टीएमसी
टँकरद्वारे पाणीपुरवठा - ०.१९ टीएमसी
समाविष्ट गावांसाठी - २.१५ टीएमसी
तरल लोकसंख्येसाठी - ०.१७ टीएमसी
व्यावसायिक पाणीवापर - ०.३३ टीएमसी
३५ टक्के पाण्याची गळती - ७.७२ टीएमसी
एकूण - २१.४८ टीएमसी